नागरिकांसह माजी महापौरांनी घेतली अधिकाऱयांची भेट : समस्या सोडविण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कोनवाळ गल्ली परिसरातील डेनेजवाहिनी तुंबल्याने रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेण्यात आली नसल्याने बुधवारी महापालिकेच्या अधिकाऱयांची भेट घेऊन समस्येचे निवारण करण्याची मागणी करण्यात आली. माजी महापौर सरिता पाटील यांनी अधिकाऱयांशी चर्चा करून डेनेज समस्या सोडविण्याची सूचना केली.
कोनवाळ गल्ली परिसरात डेनेजवाहिन्या तुंबल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील काही चेंबरची दुरुस्ती करून समस्येचे निवारण करण्यात आले तर भंगीबोळात सकिंग मशीनचे वाहन जात नसल्याचे सांगून समस्येचे निवारण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे या समस्येची पाहणी करून तातडीने निवारण करावे, अशी मागणी आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ आणि पर्यावरण साहाय्यक अभियंते आदिलखान पठाण यांच्याकडे करण्यात आली.
यापूर्वी अनेकवेळा तक्रारी केल्यानंतर मनपाच्या कर्मचाऱयांनी डेनेजवाहिनी स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला होता. पण समस्येचे निवारण झाले नसल्याने अधिकारी व कर्मचारी फिरकले नसल्याच्या तक्रारी करून सदर समस्येचे निवारण कायमस्वरुपी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात
आली.
यावेळी शांता मेलगे, वीणा सूर्यवंशी, शंकर जेलुगडेकर, रेखा किल्लेकर, अनंत कडोलकर आदी उपस्थित होते.









