एका बाजूच्या भिंतीचे बांधकाम पूर्ण, नागरिकांत समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
कोनवाळगल्ली नाल्याचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेले होते. नव्याने बांधलेली भिंत सहा महिन्यातच कोसळल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. सदर नाल्याच्या भिंतीच्या बांधकामाचे काम सुरू करण्यात आले असून, एका बाजूच्या भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गल्लीच्या बाजूने असलेल्या भिंतीचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे.
कोनवाळगल्ली नाल्याची भिंत 2018 मध्ये कोसळली होती. सदर भिंतीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यामुळे महापौर अनुदानातून व एसएफसी अनुदानातून दहा लाखाचा निधी खर्चून येथील शाळेच्या बाजूने भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र सदर बांधकाम नव्याने करण्याऐवजी जुन्या भिंतीवर दगडी बांधकाम करून उंची वाढविण्यात आली होती. त्यामुळे सदर भिंतीचे बांधकाम पावसाळय़ात भुईसपाट झाले होते. पूर्ण भिंत नाल्यात कोसळली होती. परिणामी सदर भिंतीचे बांधकाम नित्कृष्ट झाल्याचा आरोप करून कंत्राटदाराकडून सदर निधी वसूल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. पण या भिंतीचे बांधकाम पुन्हा करून देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले होते. मात्र भिंतीचे बांधकाम झालेच नव्हते. त्यामुळे नाल्यात कोसळलेल्या भिंतीचे अवशेष व माती अडकून राहिल्याने पावसाळय़ात नाल्याचे पाणी कोनवाळगल्लीतील घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे नागरिकांचे नुकसान होऊन आर्थिक फटका बसला होता. तसेच परिसरातील घरांना व शाळेच्या इमारतीला नाल्याच्या पूराचा धोका निर्माण झाला होता. परिणामी सदर भिंतीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन भिंतीच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करून मागील वषी नाल्याच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला होता. पण पावसाच्या पाण्यामुळे हे काम झाले नव्हते. मात्र अलिकडे सदर नाल्यामधून वाहणारे सांडपाणी वळवून भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
सदर नाल्याच्या भिंतीचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. शाळेकडील भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, गल्लीच्या बाजूच्या भिंतीचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. हे काम तांत्रिकदृष्टय़ा व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचे होत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









