प्रतिनिधी / पन्हाळा
पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मुख्य बाजारपेठ असलेले कोतोली गाव सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. आज दुपारपर्यंत कोतोली गावात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर सायंकाळी सहापर्यंत आणखी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज एकाच दिवशी 11 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गावात बाधितांचा आकडा 36 वर पोहचला आहे.
कोतोली गाव हे पन्हाळा तालुक्यातील मोठ्या बाजारपेठे पैकी एक असून गावाची लोकसंख्या देखील मोठी आहे. गेल्या आठ दिवसांपासून येथे कोरोनाने बस्तान बसविले आहे. कालपर्यंत याठिकाणी 25 रुग्णसंख्या होती. मात्र आज तब्बल 11 जणांची वाढ झाल्याने कोरोनाचा हा आकडा वाढत चालला आहे. सध्या गाव कोरोनासंसर्गामुळे कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तिंना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर लक्षणे दिसणाऱ्यांची स्वॅब तपासणी सुरु आहे. पण कोरोनाची साखळी तुटण्याऐवजी वाढतच चालल्याचे चित्र एकदंरीत दिसून येत आहे.








