धामोड / वार्ताहर
कोते ( ता. राधानगरी ) या ग्रुप ग्रामपंचायतीच्या पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच अनिता सचिन पाटील यांच्याविरुद्ध सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. नऊ विरुद्ध एक अशा मतांनी हा ठराव मंजूर झाला. मनमानी कारभार , कामकाजात सदस्यांना विश्वासात न घेणे, ग्रामस्थांची कामे न करणे अशा कारणांचा ठपका ठेऊन नऊ सदस्यांनी राधानगरीचे प्रभारी तहसीलदार विजय जाधव यांच्याकडे चार दिवसापूर्वी अविश्वास ठराव दाखल केला होता.
आज बुधवारी प्रभारी तहसिलदार विजय जाधव यांनी ग्रामपंचायतीमध्ये विशेषसभा घेऊन या ठरावाचे वाचन केले. उपस्थित विरोधी गटाच्या नऊ सदस्यांनी या ठरावाला संमती दर्शवत सरपंच अनिता पाटील यांच्याविरूध्द बोटे वर करून मतदान केले. यावेळी राधानगरीचे प्रभारी तहसीलदार विजय जाधव यांनी नऊ सदस्यांनी सरपंच अनिता पाटील यांच्याविरूद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव नऊ विरूध्द एक अशा मतदानाने मंजूर करत असल्याचे घोषीत केले.
गोतेवाडी, मानेवाडी मिळून कोते ग्रुप ग्रा.पं असून सरपंचपदासह सदस्य संख्या दहा आहे. तीन वर्षापूर्वी अंबाबाई ग्रामविकास आघाडी विरुद्ध युवा आघाडी अशी दुरंगी लढत झाली होती. त्यात युवा आघाडीने सरपंचपद पटकावले. तर विरोधी अंबाबाई आघाडीने नऊ पैकी नऊ सदस्य जागा जिंकल्या होत्या. येथूनच या दोन आघाड्यामध्ये विकासकामावरून सुंदोपसुंदी व राजकीय ईर्षा सुरू होती. त्याचे पर्यावसान आज अविश्वास ठरावापर्यंत पोहचले. अविश्वास ठराव दाखल झाल्याने पुढील घडामोडीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे.
या सभेस सरपंच अनिता पाटील, उपसरपंच धनाजी वडाम,सदस्य विलास पाटील, आबाजी कांबळे , धोंडीराम तेलवी, श्रीलेखा सुतार , शितल जंगले, सविता गोते , छाया गोते , रंजना माने, यांच्यासह ग्रामसेवक एन.एस. पाटील, तलाठी संदिप हजारे, पोलीस पाटील श्रीकांत कांबळे उपस्थित होते.
मी लोकनियुक्त सरपंच म्हणुन जनतेतून निवडून आले आहे. त्यामुळे माझ्यावर अविश्वास ठराव आणण्याचा अधिकार फक्त जनतेचा( ग्रामसभेचा )आहे. त्यासाठी मी मुंबई हायकोर्टकडे आपिल केले आहे. न्यायालयाच्या निर्णयावर माझा विश्वास आहे. मी त्या निर्णयाची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया सरपंच अनिता पाटील यांनी तरुण भारतशी बोलताना दिली.
Previous Articleसावळज परीसरात अग्रणी नदीला पुर
Next Article वीरशैव’ च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा गोकुळमध्ये सत्कार









