ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मागील 2 महिन्यांनापासून दिल्लीच्या सीमवेवर शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला प्रजासत्ताक दिनादिवशी गालबोट लागले. ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी दीप सिद्धू यांच्यावर शेतकऱ्यांना भडकवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर कोण आहेत हे दीप सिद्धू? असा प्रश्न समोर आला.
दीप सिद्धू हे नोव्हेंबरपासून कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनात सक्रिय आहेत. त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून फेटाळून लावले आहेत. ‘आंदोलनकर्त्यांनी लोकशाहीच्या अधिकारानेच लाल किल्ल्यावर निशान साहिबचा झेंडा फडकवला. आम्ही भारतीय झेंडा फडकवला नाही.’ असे त्यांनी म्हटले आहे.
सिद्धू हे पंजाबी गायक आणि अभिनेते आहेत.2015 मध्ये सिद्धूचा ‘रमता जोगी’ हा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. 2018 मध्ये ‘जोरा दस नंबरिया’ या सिनेमाने तो प्रसिद्धीच्या झोतात आला. किंगफिशर मॉडेल हंट पुरस्कार मिळवण्यापूर्वी तो बार कॉउन्सिलचा सदस्यही होता. 2019 मध्ये भाजपा खासदार सनी देओल यांच्या प्रचारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीत सिद्धू होता. त्यामुळे सिद्धू हे भाजपचे एजंट असल्याचा आरोपही त्यांच्यावर होत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सनी देओल आणि सिद्धूयांचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. दरम्यान, सनी देओल यांनी दीप सिद्धू यांच्याशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नसल्याचे ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.