राजस्थान रॉयल्सचा युवा अष्टपैलू रियान परागने रविवारी दुबईत सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विजय तर मिळवून दिलाच. पण, त्याशिवाय, विजयाचा आनंद साजरा करताना त्याने साकारलेला बिहू डान्स सोशल मीडियावर विशेष झळकत राहिला. त्या लढतीत विजयासाठी 42 चेंडूत 71 धावांची आवश्यकता असताना व 5 गडी बाकी असताना राजस्थान रॉयल्सने राहुल तेवातिया (28 चेंडूत 45) व रियान पराग (26 चेंडूत 42) दमदार कामगिरी साकारत विजय खेचून आणला. या विजयाप्रमाणेच रियान परागचा बिहू डान्स देखील नेटिझन्समध्ये विशेष चर्चेत राहिला.
वास्तविक, सनरायजर्सने राजस्थान रॉयल्सला 5 बाद 78 असे जवळपास पराभवाच्या खिंडीत गाठलेच होते. बेन स्टोक्स, जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ, संजू सॅमसन यांच्यासारखे अव्वल फलंदाज तंबूत परतल्यानंतर विजयाचे लक्ष्य आणखी कठीण झाले होते. पण, तेवातिया व पराग या डाव्या-उजव्या फलंदाजांनी राजस्थानसाठी देदीप्यमान विजय संपादन करुन दिला. 18 वर्षांचा रियान पराग व तेवातिया यांचे संयम व आक्रमण यावेळी विशेष लक्षवेधी ठरले. अर्थात, विजय संपादन करुन दिल्यानंतर रियान परागने जो बिहू डान्स स्वीकारला, त्यानेही क्रिकेटप्रेमींच्या डोळय़ाचे पारणे फेडले. आता हा बिहू डान्स कुठून आला, हा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच. रियान पराग हा मूळ आसामचा असून त्या राज्यात बिहू डान्स उत्तमरित्या रुजले आहे. आनंद, जल्लोषाचे प्रतीक म्हणजे बिहू डान्स हे तेथील समीकरणच झाले आहे. साहजिकच, दमदार विजय संपादन केल्यानंतर रियान परागच्या आनंदाला उधाण आले आणि त्याने चक्क मैदानावरच बिहू डान्स साकारला. येत्या काही दिवसात स्पष्ट होऊ शकेल.