बोलबच्चन व्यक्तीची जीभ एकदा घसरायला लागली कि ती त्यासोबत काय काय घरंगळत बाहेर काढेल याचा काही नेम नाही. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव अशाच बोलबच्चनगिरीबद्दल कुख्यात आहेत. सरकारी नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा युवकांनी पानपट्टी टाकावी, गाय पाळावी असला आगंतुक सल्ला देणारे हे महोदय. यापूर्वी गौतम बुद्धांनी न केलेल्या पायी परदेश दौऱयांचे विश्लेषण याच महोदयांनी करून जगाला आश्चर्यचकित करणारी माहिती दिली होती. महाभारत काळात इंटरनेट सुविधा कशी होती आणि संजयने धृतराष्ट्राला महाभारताची खबरबात सांगण्यासाठी त्याचा वापर कसा केला याचे आख्यान त्यांनी यापूर्वी झोडले आहे. आपल्या नेतृत्वाला खूश करण्यासाठी काही ना काही बडबडत रहायचे हे अशा मंडळींचे कामच असते. पण अशा लोकांना वेळीच रोखले नाही तर त्यांच्या जीभेने ज्या करामती घडतात त्याला सावरणे पुढे फार अडचणीचे ठरू शकते. आता बिप्लव देव यांच्या ताज्या वक्तव्याला जर शेजारी राष्ट्रांनी गांभीर्याने घेतले तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला विनाकारण सारवासारव करण्याची वेळ येऊ शकते. गृहमंत्री अमित शहा यांचे निवडणूक व्यवस्थापन आणि जिंकण्याचे कौशल्य नक्कीच निर्विवाद आहे. देशातील अनेक निवडणुका जिंकून त्यांनी आपल्या या कौशल्याचे दर्शन घडविले आहे. बंगालच्या निवडणुकीतसुद्धा विरोधकांच्या गोटातील लोकांना भाजपमध्ये आणून दाखवत त्यानी आपल्या गुणांचे दर्शन घडवले आहे. दहा वर्षात ममता बॅनर्जी यांना हरवता आले नाही हे लक्षात आल्यानंतर हताश झालेल्या डाव्यांनीही बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीला भाजपला मतदान केले, आपल्या मतदारांना भाजपकडे वळू दिले, ही चर्चासुद्धा शहा यांच्या कौशल्याचीच चुणूक. याबद्दल बिप्लव देव यांना अधिक कौतुक वाटले तर समजण्यासारखे आहे. पण जगातील सर्वात मोठा पक्ष बनलेल्या भाजपला केवळ भारतातच नाही तर शेजारच्या देशांमध्येही विस्तार करायचा आहे. श्रीलंका आणि नेपाळमध्येसुद्धा आपल्या पक्षाचे सरकार स्थापन करण्याची अमित शहा यांची योजना आहे असे उद्गार देव यांनी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे पक्षाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात काढले. बोलबच्चनगिरी म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे तर सध्याचा काळ तितका साधासरळ राहिलेला नाही. भारताच्या या दोन्ही शेजारी राष्ट्रांना काही ना काही कारणांनी भारताने कुरापत काढण्याची संधी हवी आहे. तिथला एक गट भारताच्या बाजूने बोलला तर दुसरा लगेच विरोधात उभा राहू शकतो. अलीकडच्या काळात चीन आणि भारताचे संबंध ताणले असताना अचानकच नेपाळने आपला नवा नकाशा जारी करून भारतीय भूमीवर हक्क सांगितला होता. भारताबद्दल अनेक आरोप करण्यात आले होते. नेपाळच्या अंतर्गत वादात हा मुद्दा थोडा बाजूला पडला आहे. तीच अवस्था श्रीलंकेच्या बाबतीत आहे. सिंहली आणि तामिळी वादामध्ये भारताला आधीच फार संयत भूमिका घ्यावी लागते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना याची किंमत आपले प्राण गमावून मोजावी लागली आहे. आंतरराष्ट्रीय वादांमध्ये पडणे किंवा त्यावर भाष्य करणे हे मुत्सद्दी व्यक्तींचे काम असते. बिप्लव देव स्वतःला मुत्सद्दी मानत असतील तर तो भाग वेगळा. मात्र भारत सरकारला अशा बोलक्मया बाहुल्यांवर आपली भिस्त कधीच ठेवता येणार नाही. अलीकडेच लंकेने बंदर निर्मिती आणि दळणवळणाच्या बाबतीतील भारत आणि जपान बरोबरचा महत्वपूर्ण करार मोडला आहे. त्याबाबत परराष्ट्र मंत्रालय मोठी मेहनत घेत आहे. भारतामुळे जपान ही त्यात अडकल्याने भारतासाठी तो दुहेरी अडचणीचा मुद्दा आहे. अशा काळात त्या देशात भाजपची सत्ता आणण्याचा शहा यांचा प्रयत्न आहे असे एका मुख्यमंत्र्याने म्हणणे भारताला अडचणीत आणणारे ठरू शकते. त्यांच्या वक्तव्याचे निमित्त करून बोलणी फिसकटली तर त्याचा फटका भारताला बसू शकतो. चीन आणि भारतामध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर शेजारी राष्ट्रांनीही भारताच्या कुरापती काढाव्यात यासाठी चीनने कूटनीती वापरली होती. बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेने भारताशी असलेले व्यापारी आणि अन्य करार मोडून चीनशी व्यवहार करावा आणि भारताला एकटे पाडावे यादृष्टीने अनेक खेळय़ा केल्या होत्या. याची गांभीर्याने चिंता भारत आणि चीनदरम्यान निर्माण झालेल्या तणावावेळी व्यक्त केली गेली होती. आता या दोन राष्ट्रांमध्ये सामंजस्याचे प्रयत्न सुरू असताना चीन शेजारी राष्ट्रांना भारताविरुद्ध उत्तेजन देण्याची संधी का सोडेल? अशा काळात एखादा भारतीय राजकारणी काय बडबडतो यालाही खूप महत्त्व प्राप्त होते. अर्थात त्रिपुरा हे अत्यंत छोटे राज्य आहे आणि त्याचा मुख्यमंत्री भारतात संघराज्य व्यवस्थेत मोठय़ा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी इतकेच महत्त्व बाळगून असला तरी देशाच्या आणि जगाच्या पातळीवर विचार केल्यास एखाद्या महानगराचा महापौर आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री यांच्यामध्ये फारसा काही फरक नाही. पण ते बडबडत आहेत त्या विषयात देशाच्या गृहमंत्र्यांच्या नावाचा वापर केला आहे. या पदावरील व्यक्तीच्या मनात आपल्या देशाच्या बाहेर, परराष्ट्रात हस्तक्षेप करायचा विचार आहे आणि त्यातला निवडणूक प्रक्रियेत एक भारतीय पक्ष उतरू इच्छितो असे वक्तव्य फारच खळबळ माजवू शकते. पण, जाणून बुजून अशा वक्तव्यांकडे देशाला दुर्लक्ष करून चालणार नाही. गौतम बुद्धांचा प्रवास, महाभारत काळातील इंटरनेट अशा गोष्टींवर केलेल्या वक्तव्याबद्दल बिप्लव यांची फारशी दखल घेतली जाणार नाही. मात्र, जगावर हवलदारकी करणाऱया चीन सारख्या देशाकडून दोन्ही राष्ट्रातील भारतविरोधी शक्तींना उचकटून उभे करण्यासाठी हे वक्तव्य पुरेसे आहे.त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी त्यांची कान उघाडणी करावी आणि अशा व्यक्तींना आवरावे हीच अपेक्षा.
Previous Articleट्रक्टर मागणीत तेजी राहणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








