प्रतिनिधी/ सातारा
जरंडेश्वर कारखान्याने पूर्वीचे कर्ज हे आमच्याकडून घेतले नव्हते. आताचे एक्स्पॉशनसाठी 100 कोटी कर्ज दिले होते. ते कर्ज नियमानुसार दिले गेले आहे. कर्ज मंजूरीचा विषय ज्या सभेत झाला. त्या सभेला संचालक म्हणून खासदार उदयनराजेंची हजेरी होती. त्यांनी त्यावेळी का विरोध केला नाही. त्यांची सही प्रोसिडिंगवर आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, जिल्हा बँकेच्या मेडिक्लेमचा प्रिमियम विमा कंपन्यांनी कमी केला नाही. तेवढे पैसे भरले असते तर पुन्हा हेच म्हणाले असते बँकेच्या सभासदांच्या पैशाची उधळपट्टी केली म्हणून. मेडिक्लेमच्या प्रियिमयचे काम अंतिम टप्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, कोणाची जिरवायची अन् कोणाला निवडून आणायचे हे मतदार ठरवतील. आम्हाला जिरवा जिरवीची हौस नाही, असा टोलाही शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना लगावला.
जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रराजे बोलत होते. ते म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱयांच्या हितासाठी सभासदांच्या फायद्याची मेडिक्लेम योजना सुरु केली आहे. त्याचा प्रिमीयम विमा कंपन्यांनी जास्त सांगितला होता. तेवढा प्रिमियम बँकेला भरणे परवडणारे नव्हते. म्हणून विमा कंपनीशी बोलणे सुरु होते. त्यांचा कोटा जास्त होता. 103 कोटी भरा म्हणत होते. एवढे पैसे भरले तर पुन्हा हीच मंडळी सभासदांच्या पैशांची उधळपट्टी केली म्हणून आरोप करतील. ते काम अंतिम टप्यात आले आहे, असे स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, जरंडेश्वर कारखान्याला पूर्वी कर्ज जिल्हा बँकेने दिले नव्हते. कारण त्यांनी मागणी केर्लीं नव्हती. आता दिलेले कर्ज हे नाबार्ड आणि आरबीआयच्या निकषानुसार आहे. दिलेल्या कर्जाचे हप्ते कुठेही थकले नाहीत. वेळेवर हप्ते फेडले जात आहेत. दिलेले कर्ज हे कारखान्याच्या एक्स्पाशनसाठी दिले गेले आहे. हे कर्ज देण्याचा विषय ज्या मासिक सभेत झाला त्या मासिक सभेला स्वतः उदयनराजेंची हजेरी होती. त्यांची सही प्रोसिडिंगवर आहे. त्यावेळी तुमची सही आहे. त्यावेळी तुम्ही का विरोध केला नाही. जे आहे ते आहे. ज्यांना मतदारांची साथ नाही. त्यांना पराभव समोर दिसतो आहे. म्हणून आरोप सुरु आहेत. जरंडेश्वर कर्ज प्रकरणाची माहिती द्यायला आमचा कुठे नकार आहे, अशीही त्यांनी टीप्पणी केली.
माझच अजून कन्फर्म नाही
पॅनेलमध्ये घ्या म्हणून दबाव आणतात का?, असा प्रश्न छेडला असता शिवेंद्रराजे म्हणाले, माझच अजून कन्फर्म नाही. घेण्याचा अधिकार मला नाही. शिवेंद्रराजेंशी बोला असे मी पेपरात वाचले. प्रत्यक्षात खाजगीत रामराजें मला म्हणाले की तसे काही बोलणे झाले नाही. कालही बँकेत रामराजेंनी मला चार तास बसवून ठेवले. पॅनेलमध्ये घेणार काय अशी विचारणा केली तर विचारुन सांगतो म्हणाले रामराजे, असेही त्यांनी आर्वजून सांगत टीप्पणी केली.
सर्व विषय नियमानुसार घेतले जातात
बँकेच्या मासिक सभेत सर्व संचालकांना विषय मांडण्याचे नियमानुसार अधिकार असतात. सर्वांचे विषय घेतले जातात. पुर्वीपासूनचीच बँकेची पद्धत आहे. मात्र, त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ते बँकेच्या मासिक मिटींगवेळी रजेवर असतात. 82 मिटींगपैकी 62 मिटींगचे अर्ज आहेत, असे जाहीर करत आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, आम्ही कोणाची जिरवत नसतो. त्यांच्याही ताब्यातल्या सोसायटीचे कर्ज आडवले नाही. त्यांना कर्ज दिले आहे. कर्ज दिल्याशिवाय बँक चालणार कशी, असा प्रतिसवाल आमदार शिवेंद्रराजेंनीच केला.
तुमच्या सल्लागारांनाच तुम्हाला बँकेत येवू द्यायचे नसेल
उदयनराजेंच्या सल्लागारांनाच त्यांना बँकेत येवू द्यायचे नसेल. त्यामुळे ते सल्ले देत असतील. ते सल्लागार कोण आहेत याची माहिती घेतो, असे सांगत मी बँकेची गाडी वापरत नाही. बँकेच डिझेल वापरत नाही. चुकीचे काम केले तर आरबीआय आहे, नाबार्ड आहे. ते काय माझे पाहुणे नाहीत, असेही आमदार शिवेंद्रराजेंनी सांगितले.
पालिकेची निवडणूक येईल तेव्हा बोलूच
सातारा पालिकेची निवडणूक येईल तेव्हा आम्ही बोलूच, असे सांगत पुढे आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन असेल म्हणाले होते काय घडले हे सर्व सातारकरांना ज्ञात आहे. एक सामान्य महिलेला निवडून देणार म्हणले होते. काय झाले हे सातारकर पहाताहेत. सायरस पुणावालाकडून स्वच्छता करुन घेणार होते काय झाले हे सातारकर पहाताहेत. अशोक मोनेंच्या वेळी त्यांनी केलेले वक्तव्य आठवले तरी समजेल. म्हणाले होते, सगळया पदाचा राजीनामा देणार. मोने निवडून आल्यानंतर म्हणाले होते की असेच बोललो. तसे त्यांचे ऍक्टींग टिचर जे होते ते भारी होते, अशीही फिरकी त्यांनी घेतली.
पुरावे आहेत तर ईडीच्या कार्यालयात द्यायचे
ईडीबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे जर पुरावे आहेत तर त्यांनी असे तसे कामानिमित्त मुंबईला जातात तसे पुरावे घेवून ईडीच्या कार्यालयात जावे अन् ते द्यावे, असा सल्ला शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंना दिला.
जंबो बंद करु नये
जंबो आताच बंद करु नये. अजून सहा महिने तरी शासनाने सुरु ठेवावे. तेथील कर्मचाऱयांनाही काढू नये. दुसऱया लाटेपूर्वी असेच बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाही कामावरुन कमी केलेल्या नर्सेस काम करण्यास तयार नव्हते. आताही तिसऱया लाटेच्या अनुषंगाने किमान सहा महिने तरी जंबो बंद करु नये यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर आमदार शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केले.









