जिल्हाधिकाऱयांची अधिकाऱयांना बैठकीत सूचना : कामगार कार्यालयाकडे कागदपत्रे पाठविण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाकाळात असंघटित कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे सरकारने त्यांना पॅकेज जाहीर केले आहे. ती रक्कम कोणत्याही एजंटांच्या हस्तक्षेपाशिवाय थेट कामगारांच्या बँक खात्यावरच जमा करण्यासाठी पाऊल उचला, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक घेऊन त्यांनी ही सूचना अधिकाऱयांना केली. यावेळी कामगार खात्याचे अधिकारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. असंघटित कामगारांना 2 हजार रुपये सरकारकडून मिळणार आहेत. तेव्हा ती रक्कम कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी योग्यप्रकारे नियोजन करा. तातडीने त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करा. त्यामध्ये कोणत्याही एजंटचा किंवा कोणाचाही हस्तक्षेप राहू नये, याची काळजी घ्या, असे त्यांनी सांगितले.
11 असंघटित कामगारांच्या गटांना आर्थिक मदत
टेलर, धोबी, हमाल, नाभिक, कुंभार, घरगुती काम करणारे, मेकॅनिकल, लोहार यासह इतर अशा एकूण 11 असंघटित कामगारांच्या गटांना ही आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी आपली कागदपत्रे कामगार कार्यालयाकडे पाठवून देऊन मदत मिळवून घ्यावी, असेही यावेळी आवाहन करण्यात आले आहे. एकूणच यामध्ये कोणत्याही प्रकारचा बेजबाबदारपणा असू नये, असे त्यांनी सांगितले.
बांधकाम कामगारांना तीन हजार रुपये
बांधकाम कामगारांसाठी जिल्हय़ाला 45 कोटींची आर्थिक मदत करण्यात आली आहे. बांधकाम कामगारांची अधिकृत नोंदणी झाली आहे त्यांना सरकार 3 कोटी रुपये आर्थिक मदत देणार आहे. तर असंघटित कामगारांमध्ये मोडणाऱया धोबी, टेलर, कुंभार यासह इतर 11 प्रकारच्या कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहाय्य हस्त योजनेंतर्गत 2 हजार रुपये दिले जाणार आहेत. तेव्हा संबंधितांनी नोंदणी करावी, असे ऍड. एन. आर. लातूर यांनी सांगितले.









