प्रत्यार्पणाची सर्व प्रक्रिया पूर्ण, सीबीआयचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय बँकांना 9 हजार कोटी रूपयांचा गंडा घालून फरार झालेल्या वादग्रस्त उद्योगपती विजय मल्ल्याला कोणत्याही क्षणी भारतात आणण्यात येणार आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची सर्व प्रक्रिया ब्रिटनची राजधानी लंडन येथे पूर्ण करण्यात आली असून त्याला सीबीआय अधिकाऱयांच्या आधीन करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. तो सीबीआय दलाबरोबर काही तासातच भारतात येत आहे.
सीबीआयच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार मल्ल्याला गुरूवारी पहाटे किंवा सकाळी भारतात आणले जाऊ शकते. आता त्याच्याजवळ प्रत्यार्पणापासून बचाव करण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही. त्याचे सर्व कायदेशीर प्रयत्न फोल ठरले आहेत. काही आठवडय़ांपूर्वीच त्याचे अखेरचे अपील लंडन येथील उच्च न्यायालयाने फेटाळले आहे. तसेच त्याचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा मार्गही बंद केला आहे. ब्रिटनच्या विदेश व्यवहार विभागानेही त्याच्या प्रत्यार्पणाला संमती दिल्याने आता त्याच्यासमोर भारतात येण्यावाचून दुसरा मार्ग नाही हे स्पष्ट आहे.
मुंबईत आणणार
मल्ल्या याला येत्या काही तासातच मुंबई येथे आणण्यात येणार आहे. तो गुरूवारी मध्यरात्रीनंतर पोहचला तर त्याला मुंबई येथींल सीबीआय कार्यालयात काही तास ठेवण्यात येईल. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. नंतर 11 वाजल्यानंतर त्याला न्यायालयात उपस्थित करून सीबीआय त्याची कोठडी मिळविण्याचा प्रयत्न करेल. तो सकाळी 10 नंतर मुंबईला पोहचल्यास त्याला विमानतळावरून थेट न्यायालयात नेण्यात येईल. कोठडी मिळाल्यानंतर उरलेली प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे स्पष्टीकरणही सीबीआयने दिले आहे .
ऑर्थररोड कारागृहात ठेवणार
मल्ल्याला भारतात आणल्यानंतर मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे. या कारागृहात योग्य सोयी सुविधा आहेत की नाहीत याची विचारणा ब्रिटनमधील न्यायालयाने केली होती. सीबीआयने तसे पुरावे सादर केले होते. याच कारागृहातील अतिसुरक्षित कोठडीत त्याला ठेवण्यात येईल. या कोठडीत यापूर्वी अबु सालेम, छोटा राजन, मुश्तफा डोसा, पीटर मुखर्जीया आणि 14 हजार कोटी रूपयांच्या निरव मोदी-मेहुल चोक्सी घोटाळय़ातील एक आरोपी विपुल अंबानी यांना डांबण्यात आले होते, अशीही माहिती सूत्रांनी दिली.
पाच वर्षांचा गुंगारा
2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार देशात स्थानापन्न झाल्यानंतर एक वर्षात वाय मल्ल्या ब्रिटनला पळून गेला. त्यापूर्वी काँगेसप्रणित सरकार देशात असताना त्याने हजारो कोटी रूपयांची कर्जे विविध बँकांकडून उचलली होती. ही कर्ज त्याला मिळवून देण्यासाठी त्यावेळच्या काही सत्ताधारी राजकीय नेत्यानीही आपले वजन वापरले होते, असा आरोप करण्यात येत होता. त्याच्यावरील कर्जाची एकंदर थकबाकी 9 हजार कोटी रूपयांहून अधिक आहे. त्याच्यावर सीबीआयने आरोपपत्र सादर केले आहे. त्याने दिलेला पाच वर्षांचा गुंगारा आता संपणार आहे.
ब्रिटनमध्ये न्यायालयीन अपयश
मल्ल्या ब्रिटनमध्ये पळाल्याची माहिती मिळताच भारताने त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तथापि, ब्रिटनशी भारताचा प्रत्यार्पण करार नसल्याने अडचण निर्माण झाली. अखेरीस ब्रिटनच्या न्यायालयात प्रत्यार्पण आवेदन सादर करण्यात आले. सीबीआयने हे प्रकरण पूर्ण तयारीनिशी लढवले. 2018 मध्ये लंडन येथील कनिष्ठ न्यायालयाने त्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश दिला. त्याने या आदेशाविरोधात सादर केलेले अपील लंडन येथील उच्च न्यायालयाने फेटाळले. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला.
डाग धुतला जाणार
मल्ल्या पळून गेल्यानंतर विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. मोदी सरकारनेच त्याला पळून जाण्यास साहाय्य केले. दिवंगत नेते व तत्कालीन अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्याला जाऊ दिले, असे गंभीर आरोप करण्यात आले. तथापि, मोदी सरकारच्या अथक प्रयत्नांना आता यश आल्याने सरकारवरचा डाग धुतला जाऊन त्याची प्रतिमा उजळणार आहे, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले.









