आंतरराष्ट्रीय किर्तीचे वैज्ञानिक डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांचे मत
गुगल स्कॉलर…!
- अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये मानद प्राध्यापक
- 500 शोधनिबंध प्रकाशित
- गुगल स्कॉलर हे बिरुद
- अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित
प्रतिनिधी / बेळगाव
कोणतेही औषध बाजारपेठेत आणण्यासाठी किमान 10 वर्षे त्यावर संशोधन चालते. अब्जावधी रुपये त्या औषधाच्या संशोधन चाचणीसाठी गुंतवावे लागतात. त्यामुळे प्रत्येक औषधाच्या निर्मितीमागे अनेक वर्षांचे संशोधन असते. म्हणूनच कोरोनावरील लससुद्धा इतक्मया सहजी आणि लवकर बाजारपेठेत येईल, असे नाही. फक्त कोरोनाने आणीबाणीजन्य परिस्थिती आणली, त्यामुळे त्यावरील लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. परंतु किमान 2021 पर्यंत ही लस येऊ शकणार नाही. हे मत आहे आंतरराष्ट्रीय किर्तीचे बेळगावस्थित वैज्ञानिक डॉ. श्रीनिवास कुलकर्णी यांचे….
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने फार्माकोलॉजी (औषधशास्त्र) या विभागात काम केलेल्या वैज्ञानिकांची क्रमवारी जाहीर करणारे सर्वेक्षण नुकतेच केले. या सर्वेक्षणात डॉ. कुलकर्णी यांचा जगात 132 वा व भारतात प्रथम क्रमांक लागतो. चार्टर्ड अकौंटंट श्रीनिवास शिवणगी यांच्यामुळे त्यांची मुलाखत घेतली असता त्यांनी औषध निर्मिती प्रक्रिया, सदर सर्वेक्षण औषध निर्मितीमध्ये भारताचे स्थान, आजचे शिक्षण अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. बेळगाव हे पत्नी मोहिनी हिचे आवडते गाव असल्यामुळे आपण बेळगावला स्थायिक झालो आहोत, असे त्यांनी आवर्जुन नमूद केले.
आपले बालपण आणि शिक्षण याबद्दल काय सांगाल?
मी मूळचा विजापूर जिल्हय़ातील बसवन बागेवाडी गावचा. माझे वडील सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होते. त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे माझे प्रारंभीचे शिक्षण विजापूरमध्ये व नंतर धारवाडच्या कर्नाटक कॉलेजमध्ये झाले. बेंगळूरच्या सरकारी फार्मसी कॉलेजमधून बी-फार्मा ही पदवी घेतली. अंतिम परीक्षेत विद्यापीठात मी प्रथम आल्याने सुवर्णपदकाचा मानकरी ठरलो. 1968 ला बेंगळूर विद्यापीठामध्ये ही पदवी घेणारी आमची सर्वात पहिली बॅच होती.
त्या काळात दक्षिण भारतामध्ये पीएचडीसाठी सुविधा नव्हती. त्यामुळे राजस्थानच्या सवाई मानसिंग कॉलेजमधून मी पीएचडी पूर्ण केली. 1974 मध्ये मी पुढील शिक्षणासाठी फ्रान्सला गेलो व पाच वर्षे अमेरिकेच्या ओक्लाहोमा विद्यापीठामध्ये संशोधन करतानाच फार्मसी हा विषय शिकवत होतो.
पंजाब विद्यापीठाशी तुमचा संपर्क कसा आला?
पंजाब विद्यापीठाने मला संशोधनासाठी निमंत्रित केले. या विद्यापीठाला ‘ड्रग रिसर्च’ हा विभाग सुरू करावयाचा होता. तेथे मी अनेक वर्षे काम केले. येथेच विभागप्रमुख झालो. पुढे डीन होऊन प्र-कुलगुरु म्हणून निवृत्त झालो. निवृत्तीनंतर चार वर्षे ‘बॉम्बे कॉलेज ऑफ फॉर्मसी’ येथे काम केले. मात्र, हे करत असतानाच ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ, टेक्सास हेल्थ सायन्स विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमा, युनिव्हर्सिटी ऑफ इलिऑन्स अशा अनेक विद्यापीठांमध्ये मानद प्राध्यापक म्हणून मी जात असे.
आपले संशोधन कोणत्या क्षेत्रात आहे?
मी मानसोपचारासाठी उपयोगी ठरतील अशा औषधांचे संशोधन केले. मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतो ते प्राध्यापक मेंदूच्या मुख्य शिरांचा (सेंट्रल नर्व्हस सिस्टीम) अभ्यास करत होते. त्यामुळे मला त्याचे महत्त्व लक्षात आले, आणि मी त्याकडे वळलो. 30 वर्षांपूर्वी मी निवडलेल्या शाखेबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले, टीका केली, मात्र आज त्याचे महत्त्व कमालीचे वाढले आहे. विभक्त कुटुंब पद्धती, बदललेली जीवनशैली, सामाजिक बदल यामुळे ताण वाढला आहे, नैराश्य वाढत आहे. जो शब्द 30 वर्षांपूर्वी अपरिचित होता, तो आज परवलीचा झाला आहे. त्यामुळे आज समाजाला त्याचे महत्त्व कळते आहे. आणि मानसोपचारावरील औषधाची गरज भासू लागली आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठाने तुम्हाला जे नामांकन दिले त्याचे निकष काय आहे?
मी जवळजवळ 500 शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यामुळे मला गुगल स्कॉलर असे बिरुद मिळाले आहे. सायंटेशन इंडेक्स म्हणजे एखाद्या शास्त्रज्ञाचे लेखन किती जणांनी अभ्यासले आहे, संदर्भाला वापरले आहे, हे तपासले जाते. त्यानुसार 14 हजारहून अधिक लोकांनी माझ्या लेखनाचा संदर्भ घेतला आहे. माझ्या नावावर 5 पेटंट्स आहेत, 13 पुस्तके मी लिहिली आहेत. ती अभ्यासक्रमाला लावली आहेत, या सर्व निकषांवर हे नामांकन दिले जाते.
कोणतेही औषध बाजारपेठेत येण्याची प्रक्रिया काय आहे?
एखाद्या औषधाची निर्मिती करण्यासाठी किमान 10 वर्षे संशोधन होते. त्यामध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केलेली असते. असंख्य शास्त्रज्ञ त्यावर संशोधन करीत असतात. आज काही औषधे महागडी आहेत. याचे कारण त्यावर गुंतवला गेलेला पैसा हे आहे. प्रारंभी प्राण्यांवर त्याची चाचणी केली जाते. परिणाम, दुष्परिणाम, प्रतिसाद याचा सर्व अभ्यास करून मगच मानवी चाचणी केली जाते. आज एखाद्या आजारावर, साथीवर औषध तयार करण्याचे ठरले तर त्या क्षणापासून पुढील 10 वर्षे त्यावर काम करावे लागते.
मानवी चाचणीला प्राणी बचाव संघटनेचा, प्राणी दया संघटना यांचा विरोध होतो, त्यावर उपाय काय?
अशा चाचण्यांना होणारा विरोध लक्षात घेऊन बहुसंख्य वैद्यकीय महाविद्यालयांनी अशा चाचण्या बंद केल्या आहेत. दुर्दैवाने त्यामुळे संशोधन क्षेत्रात एक पाऊल मागे जाते आणि संशोधनाला खीळ बसते. हा विरोध योग्य नाही. कारण औषधाची निर्मिती झाल्यावर थेट मनुष्यावर त्याचा प्रयोग करताच येणार नाही. त्यामुळे प्राण्यांवर चाचणी करणे आवश्यक असते. फक्त त्यासाठी आता काही मार्गदर्शक प्रणाली आहे. तिचा अवलंब करून चाचणी करता येते. परंतु त्याबद्दल संघटनांनाच अधिक माहिती नाही. त्यामुळे विरोधाला विरोध होतो.
जेनेरिक औषधांचा दर्जा व गुण याबद्दल अनेक गैरसमज आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
जेनेरिक औषधेही ब्रॅण्डेड औषधांइतकीच गुणकारी आहेत. म्हणून तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जेनेरिक औषधे देण्यावरच भर दिला आहे. एखादी ब्रँडेड गोळी जर 50 पैशाला असेल तर तितकाच गुण देणारी जेनेरिक गोळी ही 25 ते 30 पैशाला उपलब्ध असते. त्यामुळे या औषधाच्या गुणवत्तेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.
औषध निर्मितीमध्ये भारत कोठे आहे?
गेल्या 60 वर्षांत आपण औषधक्षेत्रात खूप मोठा पल्ला गाठला आहे. आपण नवीन औषधाची निर्मिती कदाचित केली नसेल, परंतु त्याचे उत्पादन मात्र भारतात प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे इतर देशांनासुद्धा आपण औषध पुरवठा करू शकतो.
भारतीय विद्यार्थी पदवी घेतात परंतु संशोधनाकडे वळत नाहीत, याचे कारण काय?
दुर्दैवाने तुमचे म्हणणे खरे आहे. खरोखर भारताने संशोधनावर भर द्यायला हवा. विद्यार्थ्यांनी त्याचा आवर्जुन विचार करावा. कारण भारतात उद्भवणाऱया साथांवर, आजारावर, अमेरिका किंवा युरोप औषध शोधणार नाही. कारण त्यांना त्यासाठी पैसा गुंतवून चालणार नाही. त्यामुळे भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानावर अधिक गुंतवणूक करावी लागेल, विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे लागेल. सर्व तऱहेच्या मूलभूत सुविधा निर्माण कराव्या लागतील.
आपण शैक्षणिक क्षेत्रात 32 वर्षांहून अधिक काम केले. आजच्या शिक्षण पद्धतीबद्दल काय सांगाल?
माझ्या काळात असंख्य महाविद्यालये नव्हती. आज शिक्षण तुमच्या दारात आले आहे. आमच्या काळी शिक्षण घेण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागत. संख्या वाढली पण मला चिंता आहे ती दर्जाची. जर महाविद्यालयांनी दर्जा राखला नाही. आणि पुढे त्यांच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही तर त्या महाविद्यालयाची गुणवत्ता कमी होते. आज हाताने लिहिण्याची सवय गेली आहे. सर्वत्र कॉपी-पेस्ट हाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे निर्मिती क्षमता कमी होते. शेवटी तंत्रज्ञान हे साहाय्यभूत ठरावे. त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे हे आपल्यातील निर्मितीला बाधा आणणारे आहे.
संशोधनाबद्दल अनेक मानसन्मान
डॉ. श्रीनिवास कुलकर्णी त्यांच्या संशोधनाबद्दल अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सचे फेलो आहेत. युजीसी हरिओम आश्रम ट्रस्टचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला आहे. रॅनबॅक्सी रिसर्च फौंडेशन अवॉर्ड, प्राध्यापक जी. पी. श्रीवास्तव राष्ट्रीय स्मृती पुरस्कार, पंजाबरत्न याबरोबरच अत्यंत प्रति÷sच्या पी. सी. राय सुवर्णपदकाचे ते मानकरी आहेत.









