कमी उत्पन्न घटकासाठी मोफत वकील देण्याची सोय : न्यायमूर्ति आर.आर.मावतवाल
वारणानगर / प्रतिनिधी
न्यायालयात दाखल दाव्यात आपली बाजू मांडण्यासाठी तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पक्षकारांने अर्ज सादर केल्यास मोफत वकील देण्याची तरतूद आहे. याचा गरजू नागरिकानी लाभ घ्यावा असे आवाहन पन्हाळा न्यायालयाचे न्यायमूर्ती आर.आर. मावतवाल यांनी केले.
कोडोली ता. पन्हाळा येथील छत्रपती चौकात ग्रामपंचायत समोरील प्रांगणात पन्हाळा तालुका विधी सेवा समिती व वकील संघाचे संयुक्त ग्रामपंचायतीच्या सहकार्याने “न्याय आपल्या दारी ” या उपक्रमाअतंर्गत फिरत्या लोक न्यायालयाचा शुभारंभ सरस्वती पूजनाने दिपप्रज्वलन करून न्यायमूर्ती मावतवाल यांच्या हस्ते झाला. सरपंच मनिषा पाटील समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या लोक न्यायालयात ग्रामपंचायत स्तरावरील ५३ व दिवाणी ११ असे ६४ खटले निकाली निघाले असून यामध्ये ४ लाख१४ हजार २७९ रू. वसुली झाली.
आपल्या खटल्यासाठी मोफत ऐच्छिक आपल्याला हवा तो वकील देण्याची सुविधा भविष्यात लवकरच सुरू होईल मागास प्रवर्गातील घटकासाठी जातीचा दाखला अर्जासोबत जोडल्यास अशा पक्षकारांना देखील मोफत वकील देण्याची सोय सर्व न्यायालयात उपलब्ध आहे. आपल्यावर होत असलेला अन्याय सहन करण्यापेक्षा न्यायालयात आपण निर्भयपणे येवून न्याय मिळवून घ्यावा असेही न्यायमूर्ती मावतवाल यांनी सांगीतले.
शासनात अधुनिकीकरणामुळे सर्वच कामकाजाचे संगणकीकरण होत असून त्याचे संबधीत विभागाकडे सलग्नीकरण होत आहे. त्यामुळे हस्तलिखीतातील असलेल्या कामाचे संगणकी करण होत असताना काहीं त्रुटी रहातात. त्या आपल्या उत्पन्नाच्या मिळकतीवर तशाच नोंदवल्या जातात त्या वेळीच दुरुस्त करून घ्याव्यात. तसेच शासकीय द्यावे लागणारे कर व सेवांचे शुल्क वेळीच भरा अन्यथा त्यांचा बोजा आपल्या मिळकतीवर नोंद होईल यापुढे ऑनलाईन कर व सेवा शुल्क भरण्याची सोय होणार आहे. त्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या मिळकतीवरील हक्क रहाण्यासाठी सावध राहिल्यास न्यायालयात यावे लागणार नाही तसेच विविध प्रकारचे गुन्हे फौजदारी व दिवाणी दाव्यातील कायदे यापासून होणारे नुकसान याचे सविस्तर विश्लेषन उपस्थित वकिलानी केले तसेच जनतेला कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी परिपत्रके वाटण्यात आली.
जेष्ठ वकील अॅड.राजेद्र पाटील,
पन्हाळा तालुका बार असो. चे अध्यक्ष अॅड. विजयसिंह पाटील, कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एस.ए. डोईजड, फौजदार नरेद्र पाटील, म. गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बजागे, अॅड विजय पाटील यासह तालुका विधी सेवा समितीचे अनेक मान्यवर वकील ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते अॅड. राजेद्र पाटील यानी आभार मानले. ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम यासह सर्व कर्मचारी यांनी लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.