पुलाची शिरोली/वार्ताहर
कोडोली तालुका पन्हाळा येथील तिघा चोरट्यांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ओमनी कार, क्लासिक बुलेट, दोन स्प्लेंडर मोटर सायकल , करिझ्मा मोटारसायकल व इलेक्ट्रिक साहित्य असा सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी संकेत राजेंद्र वगरे वय वर्षे २०, सत्यजित राजेश पाटील वय वर्षे २२,व निरंजन संजय भोयर वय वर्षे २३, हे तिघेही राहणार कोडोली ता.पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी आहेत . याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २५ नोव्हेंबर रोजी सादळे मादळे तालुका करवीर येथील केंट क्लब मधील सुमारे ५१ हजार रुपयांची साहित्य चोरीप्रकरणी भगवान भाऊ पाटील रा. फुलेवाडी कोल्हापूर यांनी शिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीनुसार शिरोली पोलिसांनी सादळे मादळे ते कासारवाडी फाटा (महामार्ग) दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासले होते.
दरम्यान २६ नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास शिये फाटा येथे ओमनी कार महामार्गाच्या कडेला थांबलेल्या अवस्थेत दिसून आली . या ओमनी कारचा पोलिसांना संशय आल्याने या कारची तपासणी केली. यामध्ये मोठ्या आकाराची इलेक्ट्रिक मोटर दिसली . तसेच या कार मधील तिघांना ताब्यात घेऊन माला बाबत चौकशी केली असता, सदरची इलेक्ट्रिक मोटर सादळे मादळे येथील केंट क्लब मधून चोरून आणल्याची त्यांनी कबुली दिली. या कबुली नुसार न्यायालयाकडून रिमांड घेण्यात आला. त्यानुसार या संशयित आरोपीने केंट क्लब मधील एयर कंडीशनर ,इलेक्ट्रिक मोटर ,समर्सिबल पंप ,जिम चे साहित्य चोरले असल्याची कबुली दिली . तसेच त्यांनी कराड येथील आगाशिवनगर मधून क्लासिक बुलेट मोटरसायकल ,बागणी ता. वाळवा येथून स्प्लेंडर मोटर सायकल चोरी करून आणली असल्याचे कबूल केले.
शिरोली पोलिसांनी या संशयित आरोपीच्यांकडून ओमनी कार, क्लासिक बुलेट, दोन स्प्लेंडर मोटरसायकल व करिष्मा मोटरसायकल असे एकूण तीन लाख सोळा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे व उपविभागीय पोलिस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण भोसले स. फौजदार अतुल लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पवार, समीर मुल्ला, महेश आंबी, सचिन पाटील, रवींद्र घोसाळकर, प्रशांत काटकर, निलेश कांबळे आदींनी केली.
Previous Articleफडणवीस मुख्यमंत्री असतानाच मराठा आरक्षणाचा कायदा सक्षम व्हायला हवा होता : आमदार शिंदे
Next Article कदमवाडी येथे विहीरीत बिबट्याची दोन पिल्ले आढळली









