कोल्हापूर प्रतिनिधी
शहरातील पवित्र तीर्थांपैकी एक असणाऱया कोटीतीर्थ तलावातील पाणी प्रदूषणामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. सकाळी तलावातील पाण्यावर मेलेले मासे तरंगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे परिसरात दुर्गंधीही पसरली होती. तलावाच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत्युमुखी पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने या तलावातील पाणी प्रदूषण रोखण्याबरोबरच जतन, संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष केल्याने माशांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी केला.
कोटीतीर्थ तलाव शहरातील पवित्र तीर्थापैकी एक मानला जातो. उद्यमनगर परिसरात असणाऱया या तलावातील कोटेश्वर महादेवाचे मंदिरही प्राचीन असल्याचे अनेक दाखले आहे. त्याचबरोबर नारायणदास महाराजांची समाधी, स्वामी समर्थांचेही मंदिर या तलावाच्या काठावर आहे. गेल्या काही वर्षांपासून या तलावातील पाणी प्रदूषित होऊ लागले. त्यामुळे महापालिकेने या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनसही बंद घातली. त्याबरोबर जनावरे धुणे, कपडे धुणे, वाहने धुणे आदी प्रकारावर बंधने आणली. पण त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली नसल्याने त्याचा परिणम पाण्याचे प्रदूषण वाढवण्यावर झाला. पाण्यावर जलपर्णी पसरली असून रंगही हिरवा झाला आहे. पाच सहा महिन्यांपूर्वी या तलावातील कासवे मृत झाल्याचे प्रकारही घडले होते. पण त्याकडेही महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीरपणे पाहिले नसल्याचे सोमवारच्या घटनेवरून दिसते.
तलावाच्या पाण्यात आणि परिसरात कचरा
कोटीतीर्थ तलावाच्या काठावर आणि पाण्यातील स्थितीही गंभीर आहे. या ठिकाणी कचऱयाचे साम्राज असून काठावर प्लास्टिकच्या बाटल्यांसह इतर प्रकारचा कचरा पडलेला आहे. तोच वाऱयाने तलावाच्या पाण्यात मिसळत आहे. कचरा साफ सफाईकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याने तलावाची दूरवस्था झाली आहे, अशा शब्दात कोटेश्वर भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.