ऑनलाईन टीम / पुणे :
लॉकडाऊनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन शेवटची (चौथी) बस मध्यरात्री 12.30 वाजता पुण्यात दाखल झाली.
कोटा येथून आलेल्या शेवटच्या बसमध्ये 74 विद्यार्थी आणि 8 चालक होते. पुण्यात आल्यानंतर या विद्यार्थ्यांसह चालकांची आरोग्य विभागाकडून चाचणी करण्यात आली. कोटा येथून आलेल्या विद्यार्थ्यांपैकी कोणीही आजारी आढळले नाही. तसेच कोणालाही कोरोनासदृश्य लक्षणे नसल्याने सर्वांच्या हातावर 14 दिवस होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना घरी पाठवण्यात आले. हे विद्यार्थी 14 दिवस घरीच क्वारंटाईन राहणार आहेत.
राजस्थानातील कोटा येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी हे विद्यार्थी तेथे काही काळ वास्तव्यास होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन हटण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे ठाकरे सरकारने या विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय घेतला.