प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर तालुक्यातील कोगे- कुडित्रे रस्त्यावरील जुना बंधारा पाण्याखाली गेला आहे. पण नवीन पुलामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. कोगे गाव भोगावती तीरावरती वसलेले नैसर्गिक विविधतेने नटलेले गाव आहे. या गावांमध्ये भोगावती, कुंभी, तुळशी या तीन नद्यांचा संगम होतो. गेले अनेक वर्षे पावसाळा सुरू झाला की, 15 दिवसाच्या आतच हा बंधारा पाण्याखाली जात होता. त्यामुळे कोगे, कुडित्रे, बहिरेश्वर, महे, बीड या भागातील नागरिकांची जवळपास तीन महिने म्हणजे पावसाळा संपेपर्यंत गैरसोय होत होती. सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडून व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या सहकार्यातून हा नवीन पूल उभारला गेला आहे. जवळपास आठ कोटी रुपये खर्च या पुलासाठी व कोगे, महे, देवाळे, दिंडनेर्ली या रिंग रोडसाठी अंदाजीय खर्च आला आहे.
या पुलामुळे भागातील नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झालेले आहे. तरीसुद्धा या पुलावरती व बाजूला केलेला रोड याचे काम म्हणावे तसे योग्य झाले नाही, अशी कुडित्रे व कोगे गावातील ग्रामस्थांमधून कुजबुज होत आहे. कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊनच्या काळात या कामात विलंब झाला. त्यामुळे याचे काम खूप धिम्या गतीने होते. वेळेत काम पूर्ण झाले असते ,तर पुलावरील व आजूबाजूचा रोड अतिशय चांगल्या प्रतीचा झाला असता. घाईगडबडीत रस्त्याचे काम झाल्याने हा रस्ता टिकेल की नाही ? याची शाश्वती नाही. रस्ता करत असताना गावातील काही नागरिकांनी सांगूनसुद्धा हा रस्ता पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराकडून गडबड करून रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण पावसाळा सुरू झाल्याने आता या रस्त्याचा अंतिम टप्प्यातील फिनिशिंग चे काम अर्धवट राहिल्याने रस्ता खराब होण्याचे चिन्हे आहेत. नैसर्गिक वातावरण व काम याचा ताळमेळ न घेता फक्त बिले उचलण्यासाठी केलेली घाई गडबड आहे अशी कुजबूज भागातून होत आहे. आता तरी याकडे प्रशासन लक्ष देईल का ? वर राहिलेले काम उत्तम प्रतीचे होईल का ? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीतच आहे.