सुदैवाने जीवितहानी टळली : कारचा चक्काचूर
वार्ताहर/ कोगनोळी
ट्रकने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात ग्वाल्हेर-बेंगळूर आशियाई महामार्गावरील कोगनोळी हद्दीतील दूधगंगा नदीच्या पुलावर शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे जात असलेल्या इर्टिगा कारला (क्र. एम. एच. 09 एफ.क्मयू. 2059) मुंबईहून हसनकडे जात असलेल्या ट्रकची (क्र. एम. एच. 46 ए. आर. 9895) जोराची धडक बसली. या धडकेत कार दूधगंगा नदीच्या कठडय़ावर जाऊन उलटली.
या कारमध्ये हसूर सासगिरी (ता. गडहिंग्लज) येथील सात व्यक्ती प्रवास करीत होत्या. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. अपघातस्थळाचे चित्र भयानक होते. घटनास्थळी कोगनोळी पोलीस स्टेशनचे पी. एम. घस्ती, अमर चंदनशिव यांनी भेट देऊन पाहणी केली. अपघातग्रस्त वाहन उशिरापर्यंत काढण्यात न आल्याने सायंकाळी निपाणीकडे जाणाऱया महामार्गाच्या लेनवर वाहनांची रांग लागून राहिली होती.









