सीमाभागातील प्रवाशांची अडचण : आरटीपीसीआर अहवाल सक्तीचा
वार्ताहर /कोगनोळी
राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील कोगनोळी सीमा तपास नाक्मयावर नव्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून आरटीपीसीआर रिपोर्ट दाखविल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश दिला जात नाही. यामुळे कागल, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील नागरिकांना अडचणीचे ठरत आहेत. सीमाभागातील प्रवाशांची गैरसोय झाली आहे. नव्या नियमानुसार आरटीपीसीआर अहवाल असेल तरच प्रवेश दिला जात असून लसीचे प्रमाणपत्र असले तरीही प्रवेश नाकारला जात आहे. दरम्यान, टोलनाक्यावर कडक अंमलबजावणी, प्रवेशास नकार व प्रवाशांचा गोंधळ असे चित्र तपास नाक्यावर पहावयास मिळत आहे.
महाराष्ट्र व अन्य राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱया हजारो वाहनधारकांना शनिवारी व रविवारी परत पाठविण्यात आले. नवीन नियमांची कडक अंमलबजावणी सुरू असल्याने रविवारी दिवसभर केवळ 32 वाहनातून 105 लोकांनी कर्नाटकात प्रवेश घेतला. यापूर्वी सीमाभागातील उत्तूर, आजरा, गडहिंग्लज, चंदगड या ठिकाणी जाणाऱया प्रवाशांना मुभा दिली होती. परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये या सीमाभागात जाणाऱया प्रवाशांना देखील कर्नाटकातून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.









