रत्नागिरी/ प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी रत्नागिरी जिह्यात 94.73 टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी कोकण विभागातून दोन उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाटी रत्नागिरी जिह्यात एकुण 17 मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडले. जिह्यात पदवीधर शिक्षक मतदार म्हणून 4120 शिक्षकांनी नोंदणी केली होती. यापैकी 2742 पुरुष मतदार आणि 1378 स्त्री मतदारांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी जिह्यात नेमून दिलेल्या 17 मतदान केंद्रांवरती जवळपासच्या शाळांतील शिक्षकांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
रत्नागिरी जिह्यतील दापोली तालुक्यातील मतदान केंदावर 93.10 टक्के मतदान पार पडले. खेड तालुक्यात 95 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मंडणगड तालुक्यात 95.48 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली.
रत्नागिरी जिह्यात शिक्षक मतदाना करिता बहुतांशी शाळांना सोमवारी सुट्टी देण्यात आली होती तर ब-याचशा शाळा अर्धवेळ भरल्या होत्या. अनेक खाजगी शाळांतील शिक्षकांनीही सकाळी लवकर आपला मतदानाचा हक्क बजावला. रत्नागिरी शहरातील तहसीलदार कार्यालयात असलेल्या मतदान केंदावर मतदानाकरीता शिक्षकांनी दिवसभर गर्दी केल्याचे चित्र होते. सकाळी मतदान सुरु झाल्यावर या केंदाची जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी पाहणी केली. यावेळी तहसीलदार शशिकांत जाधव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.