माजी आमदार जठार यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
वार्ताहर / राजापूर
कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वे जीवनवाहिनी ठरत असताना कोकण रेल्वे मार्गावर असलेल्या अनेक रेल्वे स्थानकांमध्ये अपुऱया सोयी-सुविधा असल्याने वयोवृध्द, महिला, लहान मुले यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकांचा दर्जा सुधारावा, अशी मागणी भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील मुंबई ते मडगाव दरम्यानच्या कोलाड, सापे, वानाने, इंदापूर, गोरेगाव, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, अंजनी, कामाठे, सावर्डा, आरवली, भोके, निवसर, आडवली, विलवडे, राजापूर, वेरवली, सौंदळ, खारेपाटण, चिंचवली, कडवई या रेल्वेस्थानकांचा दर्जा सुधारण्याची आवश्यकता असल्याचे जठार यांनी रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
कोकणवासीयांसाठी रेल्वे प्रवास अत्यंत फायदेशीर ठरत आहे. हजारो प्रवासी रेल्वेने नियमित प्रवास करत आहेत. कोकणातील गणेशोत्सव, शिमगोत्सव, दिवाळी तसेच उन्हाळी हंगामात तर रेल्वेला प्रवाशांची मोठी गर्दी होती. अशावेळी रेल्वेस्थानकावर पुरेशा सोयी-सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामध्ये वयोवृध्द, महिला, लहान मुले यांची जास्त गैरसोय होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या सर्व रेल्वे स्थानकांचा दर्जा सुधारावा, अशी मागणी श्री.जठार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.









