वीर ते रोहा मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात यश
प्रतिनिधी / कणकवली:
कोकण रेल्वे येणाऱया काळात आता अधिक गतिमान होत आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर त्यादृष्टीने मार्ग दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. गेल्या काही काळात या दृष्टीने जी पावले उचलली जात आहेत, त्यातील एक महत्वाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. कोकण रेल्वेच्या मार्गावरील वीर ते रोहा या मार्गावरील दुपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात कोकण रेल्वेच्या टिमला यश आले आहे.
दुपदरीकरणाच्या या कामावर 530 कोटी रुपये खर्च होणार आहेत. रोहा ते वीर दरम्यानचे अंतिम टप्यात आलेले काम गेले सात दिवस ब्लॉक घेत पूर्ण करण्यात आले. याकालावधीत कोकण रेल्वे मार्गावरील काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या, तर काही रिशेडय़ुल करण्यात आल्या होत्या. या सात दिवसात रोहा ते वीर दरम्यानचे ट्रक जोडण्यात आले. या दोन स्थानका दरम्यानचे 46.8 किलोमीटरचे काम आता पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेचे अधिकारी, अभियंते आणि कामगार यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते. दुपदरीकरणाच्या कामांमुळे कोकण रेल्वेचा वेग वाढणार आहे. अगदी अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवापासूनच मार्गावर या दुपदारीकरणाचे फायदे दिसू लागतील. या करताच हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. कोकण रेल्वे आता टप्प्याटप्प्याने यापुढील दुपदरीकरणाची कामे पूर्ण करेल. दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मार्गावरील प्रवासात प्रवाशांचे काही तास वाचणार आहेत.









