सुकिवली नजीकची घटना, चालकाने उडी मारल्याने बालंबाल बचावला, ट्रकचा चक्काचूर
प्रतिनिधी / खेड
कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून केरळच्या दिशेने ट्रक वाहतूक करणाऱ्या रो- रो सेवेतील एक मालवाहू ट्रक अचानक रूळावर कोसळून अपघात झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास सुकिवलीनजीक घडली. ट्रक चालक वसीम याकूब शेख ( ३४ रा. पनवेल ) याने लागलीच उडी मारल्याने तो बालंबाल बचावला. अपघातामुळे कोकण मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली.
रो – रो वाहतुकीच्या सेवेतून कोलाड येथून वेरणा येथे पत्रे वाहतूक करणारा ट्रक सुकिवलीनजीकच्या वळणावर आला असता अचानक रूळावर कोसळला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मोठा आवाजाने नजीकचे रहिवाशी लगोलग घराबाहेर पडले. मात्र, अंधारामुळे ग्रामस्थांना काहीच दृष्टीस पडले नाही. अपघाताची घटना कळताच कोकण रेल्वे प्रशासनाचे आपत्कालीन पथक व अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहचले.
पथकाने कर्मचाऱ्यांच्या मदतीने मदतकार्य हाती घेत रूळावर कोसळलेला ट्रक पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास रूळावरून बाजूला करत मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. अपघातामुळे मुंबईहून रत्नागिरी दिशेने जाणारी कोकणकन्या व तुतारी एक्स्प्रेस या दोन रेल्वे गाड्या वेगवेगळ्या स्थानकावर थांबवल्या. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला आहे. २१ टनपेक्षा अधिक क्षमतेचे साहित्य होते. ट्रकचा लोखंडी साखळदंड तुटून तो कोसळला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दैव बलवत्तर म्हणून वाचलो !
रात्रीच्या सुमारास ट्रकमध्येच झोपलो होतो. अचानक ट्रकचे साखळदंड तुटले अन् ट्रक रो-रो सेवेच्या बाहेर जाऊ लागताच जीव वाचवण्यासाठी काही कळायच्या आतच बाहेर उडी मारली. या अपघातात दैव बलवत्तर म्हणून वाचलो, अशी प्रतिक्रिया ट्रक चालक वसीम शेख याने व्यक्त केली.









