तपास यंत्रणेने गोठवले होते बँक लॉकर : लॉकर खुले करण्याचा न्यायालयाचा आदेश
प्रतिनिधी / मडगांव
कोकण रेल्वेचे अधीकारी बबन घाटगे याच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप असून अटक चुकविण्यासाठी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला अर्ज न्यायालयाने निकालात काढला. मात्र त्यांचे गोठवलेले बँक लॉकर काही अटी घालून मुक्त करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
या कथित भ्रष्टाचाराचा तपास करीत असलेल्या तपास यंत्रणेने बबन घाटगे या अधिकाऱयाचे बँक लॉकर गोठविण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार बँकेने त्याचे लॉकर गोठवला होते. या लॉकरमध्ये मौल्यवान अलंकार होते. हे लॉकर मुक्त करण्यात यावे अशी विनंती करणारा एक अर्ज बबन घाटगे व त्यांच्या पत्नीने मडगावच्या सत्र न्यायालयात सादर केला होता.
या अर्जाला अनुसरुन न्यायालयाने या प्रकरणातील तपास यंत्रणेला नोटीस पाठवली आणि आपले म्हणणे सादर करण्यास फर्मावले. तपास यंत्रणेने न्यायालयात आपले म्हणणे सादर केले. कट रचणे, फसवणूक करणे त्याचप्रमाणे भ्रष्टाचाराचा आरोप ठेऊन तपास यंत्रणेने बबन घाटगे व आणखी तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 120-ब, 409, 420 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा-1988 च्या 13(2), 13 (1) (ड) कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या भ्रष्टाचार प्रकणाचा तपास सध्या चालू आहे. लॉकरमध्ये असलेल्या मौल्यवान दागिन्यांचा बेहिशोबी मालमत्तेकडे संबंध आहे का? याची खातरजमा करण्यात येत आहे आणि म्हणून बँक लॉकर गोठवलेले असल्याचे तपास यंत्रणेने न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले.
तपास यंत्रणेचे पुढे असेही म्हणणे की संशयित बबन घाटगे याचा लॉकर आहे. शिवाय काही कायम ठेवी (एफडी) आहेत. 5 लाखाचे इंडेम्नीटी बॉण्ड ठेऊन लॉकर आणि एफडी मुक्त करायला हरकत नसल्याचे तपास यंत्रणेने न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले. या पार्श्वभुमीवर, संशयित बबन घाटगे याचा गोठवलेला बँक लॉकर मुक्त करण्याचा मडगावच्या सत्र न्यायालयाने 7 ऑगस्ट 2020 रोजी आदेश दिला. या आदेशात 5,00,000 रुपयांचा इंडेम्निटी बॉण्ड सादर करावा, त्याचप्रमाणे न्यायालयाच्या परवानगीशिवाय कायम ठेवी (एफडी) वटवता कामा नये आणि लॉकरमधील दागिने विकता कामा नये किंवा हे दागिने दुसऱयांच्या नावावर करता कामा नये किंवा या दागिन्यांचा आकार बदलता कामा नये अशा अटी लादलेल्या आहेत.