चांगली सेवा, माफक दर, चांगल्या ट्रेन मिळत असतील तर अन्याय नाही
प्रतिनिधी/ रत्नागिरी
केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रात एकूण 6 लाख कोटी रूपयांच्या सरकारी मालमत्ता खासगी क्षेत्राला देण्याच्या राष्ट्रीय चलनीकरणाचा निर्णय घेतला. त्यामध्ये कोकण रेल्वेचाही समावेश आहे. मात्र या रेल्वेच्या खासगीकरणाने कोकणावर अन्याय होणार नसेल जर चांगली सेवा, माफक दर आणि चांगल्या गाडय़ा मिळत असतील तर अन्याय कसला, असा सवाल केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
नॅशनल मनिटायझेशन पाईपलाईन योजनेअंतर्गत रेल्वेमार्गासह स्थानके व पॅसेंजर गाडय़ा भाडय़ाने देऊन त्यामधून निधी उभारण्याचा निर्णय केंद्र शासन स्तरावर घेण्यात आला आहे. नॅशनल मनिटायझेशन पाईपलाईन योजनेची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच घोषणा केली. त्यात देशातील रस्ते, रेल्वे, शिपिंग, बंदरे या सार्वजनिक मालमत्तांच्या निर्गुंतवणुकीचा प्रस्ताव आहे. केंद्र सरकारने 400 रेल्वे स्टेशन्स, 90 पॅसेंजर गाडय़ा आणि 1400 किमी ट्रक भाडय़ाने देऊन 1.52 लाख कोटी रुपये उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोकण रेल्वेच्या 741 किलोमीटर मार्गाचाही त्यामध्ये समावेश आहे.
खासगीकरण झाले तर या मार्गावरील लहान-मोठय़ा असलेल्या 69 रेल्वे स्थानकांची मालकी केंद्राकडे राहणार आहे. स्थानके ठेकेदाराला केवळ चालवण्यास दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानकांचे व्यवस्थापन व तिकिटे ठरवण्याचा अधिकार ठेकेदाराकडे राहिल. योजनेच्या या धोरण व अंमलबजावणीबाबत अजूनही अनेक शंका आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे खासगीकरणाच्या दिशेने सुरू झालेली पावले दिसू लागली आहेत.
या बाबत पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकण रेल्वेचे खासगीकरणाचे समर्थन केले आहे. कोकण रेल्वेच्या खासगीकरणाने कोकणावर अन्याय होईल, असे बोलले जाते. पण खासगीकरणाने कोकणावर अन्याय होणार ही भीती येथील जनतेने सोडून द्यावी, असे राणे रत्नागिरीतील दौऱयात पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. या खासगीकरणाने माफक दरात चांगली सेवा मिळत असेल, चांगल्या ट्रेन मिळत असतील तर अन्याय कसला, असा उलट सवाल राणे यांनी केला. हे नाय, ते नाय, आम्ही दुःखी आहे, असे म्हणत कोकणी जनतेने आता रडत राहू नये, असे मत राणे यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
दुर्गम भागांच्या विकासाला खिळ बसू नये
भारतीय वा कोकण रेल्वेचे खासगीकरण होणार नसल्याची ग्वाही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली आहे. याचे स्वागत आहे. त्यातूनही खासगीकरण झाल्यास प्रवासी हित व कर्मचाऱयांची सेवासुरक्षा जपली जावी. जुने मार्ग बंद करणे, कमी नफ्याच्या मार्ग व गाडय़ांकडे दुर्लक्ष यामुळे मागास व दुर्गम भागांच्या विकासाला खिळ बसू नये.
ऍड. विलास पाटणे,
रत्नागिरी









