प्रतिनिधी/ खेड
मुंबईत धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे रूळावर पाणी साचल्याने कोकण मार्गावरून धावणाऱया 7 रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक बिघडले आहे. रविवारसह सोमवारीही कोकण मार्गावरील मडगावहून सीएसएमटी-मुंबईला जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस व 20 जुलै रोजी धावणारी नेत्रावती एक्स्प्रेसची फेरी रद्द करण्यात आली आहे.
दोनच दिवसांपूर्वी दक्षिण रेल्वे मार्गावरील पादिल-कुलासेखारा येथे रेल्वे ट्रकवर कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱयामुळे कोकण मार्गावरील रेल्वेगाडय़ांचे विस्कळीत झालेले वेळापत्रक अजूनही पूर्वपदावर आलेले नाही. रेल्वेगाडय़ा 5 ते 6 तास विलंबानेच धावत आहेत. याशिवाय 19जुलै रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस-कोच्युवेली साप्ताहिक एक्स्प्रेसची फेरी रद्द करण्यात आली.20 जुलै रोजी धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरूअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेसची फेरी रद्द करण्यात आली. लोकमान्य टिळक टर्मिनस-मंगळूर, तिरूनेलवेली-जामनगर, एर्नाकुलम-अजमेर, मंगळूर-सीएसएमटी मुंबई, सीएसएमटी मुंबई-मंगळूर एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकांवर विपरीत परिणाम झाला आहे. या रेल्वेगाडय़ा सुधारित वेळापत्रकानुसार धावत आहेत.









