प्रतिनिधी / खेड
कोरोनाच्या लॉकडाऊननंतर कोकण मार्गावरून धावणाऱ्या एर्नाकुलम-ओखा सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेसला ब्रेक लागला होता. कोरोना नियंत्रणात येत असल्याने ११ ते ३० डिसेंबर या कालावधीत एर्नाकुलम-ओखा ही गाडी साप्ताहिक महोत्सव विशेष म्हणून चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पूर्णतः राखीव राहणार आहे.
कोरोनाच्या संकटानंतर कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पूर्णत: बिघडले होते. दसऱ्यापासून बहुतांश सुपरफास्ट रेल्वेगाड्या कोकण मार्गावर धावत आहेत. दीपावली सुट्टीतही फेस्टीवला स्पेशल चालवण्यात आल्या. रेल्वे प्रशासनाकडून एका मागोमाग एक साप्ताहिक सुपरफास्ट गाड्यांची खैरात सुरूच आहे. या सर्वच रेल्वेगाड्यांना प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कोकण मार्गावर जामनगर-तिरुनेलवेली, दोन फेस्टीवल स्पेशल, गांधीधाम-तिरुनेलवेली या साप्ताहिक सुपरफास्ट गाड्या धावत असतानाच ११ डिसेंबरपासून एर्नाकुलम-ओखा साप्ताहिक महोत्सव विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दर बुधवारी व शुक्रवारी ही गाडी रात्री ८.२५ वाजता एर्नाकुलम येथून तिसऱ्या दिवशी ४.४० वाजता ओखा येथे पोहचेल.
परतीच्या प्रवासात १४ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत ओखा येथून दर सोमवारी व शनिवारी सकाळी ६.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता एर्नाकुलमला पोहचेल. १८ डब्यांची ही साप्ताहिक गाडी वसई मार्गे धावणार असून कोकण मार्गावर या गाडीला पनवेल, माणगाव, रत्नागिरी, कणकवली आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.









