तीन एक्सप्रेससह अनेक गाडय़ा 5 ते 12 तास धावताहेत विलंबाने
प्रतिनिधी/ खेड
चार दिवसापूर्वी दक्षिण रेल्वे हद्दीत घसरलेल्या मालगाडीमुळे कोकण मार्गावरून धावणाऱया रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक बिघडले आहे. तीन एक्सप्रेससह इतर अनेक गाडय़ा 5 ते 12 तास विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची रखडपट्टी होत आहे.
शनिवारी येथील स्थानकात सकाळी 11.15 वाजता दाखल होणारी 16346 क्रमांकाची नेत्रावती एक्सप्रेस सायंकाळी 4.30 वाजता स्थानकात दाखल झाली. तब्बल 5 तास उशिराने दाखल झालेल्या एक्सप्रेसमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले. या पाठोपाठ मुंबईच्या दिशेने जाणाऱया मंगला एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेस, एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेस यासह इतर गाडय़ांच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. विकेंडलाच उशिराने धावणाऱया रेल्वेगाडय़ांमुळे प्रवाशांना विलंबाच्या प्रवासाला समोर जावे लागले.









