१० फेब्रुवारीपासून धावणार, प्रवाशांना दिलासा
प्रतिनिधी / खेड
लॉकडाऊननंतर कोकण मार्गावरून धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस तब्बल ११ महिन्यानंतर रूळावर येणार आहे. १० फेब्रुवारीपासून आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार वगळता अन्य पाच दिवस ही एक्सप्रेस कोकण मार्गावर पुढील सूचना मिळेपर्यंत धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ६ फेब्रुवारीपासून आरक्षण खुले होणार आहे.
मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच २२ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला. या लॉकडाऊननंतर कोकण मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांना ब्रेक लागला. सलग ४ महिने रेल्वेगाड्या बंदच होत्या. गणेशोत्सव कालावधीत मात्र केवळ गणपती स्पेशल चालवून गणेशभक्तांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यात आले. यानंतर या गणपती स्पेशलही यार्डात विसावल्या होत्या.
कोकण मार्गावरून धावणारी ०११५१/०११५२ क्रमांकाची दादर – मडगाव सुपरफास्ट जनशताब्दी एक्सप्रेस मात्र यार्डातच उभी होती. जनशताब्दी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार तब्बल ११ महिन्यानंतर १० फेब्रुवारीपासून पुढील सूचनेपर्यंत ही एक्सप्रेस सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार व रविवारी कोकण मार्गावर धावणार आहे. ही एक्सप्रेस दादर येथून सकाळी ५.२५ वाजता सुटून दुपारी २.१० वाजता मडगावला पोहचेल.
परतीच्या प्रवासात मडगाव येथून २.४० वाजता सुटून रात्री ११.१५ वाजता दादरला पोहचेल. १५ डब्यांच्या या गाडीला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.









