गेल्या दोन वर्षांपेक्षा यंदा दुपटीने वाढ
हंगामात 24 हजार पिल्लांना जन्म
152 कासवांना जीवदान
संदीप बोडवे / देवबाग:
सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तीन जिल्हय़ांच्या किनारपट्टीवरून यंदा समुद्री कासवांची 23 हजार 706 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. गत दोन वर्षांच्या तुलनेत या वषी या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे कांदळवन विभागाकडून सांगण्यात आले. मच्छीमारी जाळय़ात अडकलेल्या संरक्षित सागरी प्रजातींची सुटका केल्याबद्दल मच्छीमारांना प्रोत्साहनपर नुकसान भरपाई देण्याच्या योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत मच्छीमारांना 22 लाख 50 हजार 850 रुपयांची मदत देण्यात आली. 152 दुर्मिळ समुद्री कासवांची जाळय़ातून सुटका करत त्यांना जीवदान देण्यात आले आहे.
2020-21 सालच्या सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात राज्यातील तीन सागरी जिल्हय़ांमध्ये कासवांची 475 घरटी आढळली. पिल्लांची आणि घरटय़ांची ही संख्या 2019-20 सालच्या हंगामापेक्षा दुप्पट आहे. पिल्लांचा जन्म होण्याचा दरही 57 टक्के आहे, जो गेल्यावषी केवळ 35 टक्के होता. जगातील समुद्री कासवांच्या 7 पैकी 4 प्रजाती भारताच्या (उपखंडांसह) किनारपट्टीवर अंडी घालण्याच्या नोंदी आहेत. यापैकी केवळ ऑलिव्ह रिडले ही समुद्री कासवांची प्रजाती महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर विणीच्या हंगामात अंडी घालण्यासाठी येते. मात्र, कासवांची शिकार, अंडय़ांची तस्करी व वन्यजीवांपासून अंडय़ांचे नुकसान यामुळे ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी धोक्मयात येत होती. परंतु गेल्या दोन दशकांपासून कोकणातील काही किनाऱयांवर स्थानिक कासवमित्रांच्या मदतीने वन विभागामार्फत कासव संवर्धनाची मोहीम राबविण्यात आली. याचा परिणाम म्हणून नागरिकांत जनजागृती सुरू झाली आहे आणि कासवांच्या घरटय़ांचे रक्षण होऊ लागले आहे.
यंदाच्या कासव विणीच्या हंगामात (2020-21) कोकण किनारपट्टीवर कासवांच्या 475 घरटय़ांचे संरक्षण करण्यात आले. गेल्या वषी हीच संख्या 228 होती. यंदा रायगड जिल्हय़ात 29, रत्नागिरीमध्ये 282, तर सिंधुदुर्गमध्ये वायंगणी, तांबळडेग, शिरोडा, मिठमुंबरी आदी किनाऱयांवर 164 घरटी संरक्षित करण्यात आली. संरक्षित केलेल्या 475 घरटय़ांमधे 50 हजार 799 अंडी सापडली होती. त्यातून 23 हजार 706 कासवांची पिल्ले जन्माला आल्याची माहिती कांदळवन विभागाकडून देण्यात आली. 2018-19 मध्ये 12 हजार 601, तर 2019-20 मध्ये 12 हजार 149 समुद्री कासवांच्या पिल्लांना घरटय़ांमधून समुद्रात सोडण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपेक्षा या वषीच्या कासव विणीच्या हंगामात दुपटीने कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे.
152 कासवांना जीवदान
महाराष्ट्राच्या कांदळवन, वन आणि मत्स्य विभागामार्फत संयुक्तपणे गेल्या वर्षापासून भरपाई योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मासेमारी जाळय़ात अडकलेल्या संरक्षित सागरी प्रजातींची जाळय़ातून सुटका केल्यास 25 हजार रुपयांपर्यंत मच्छीमारांना भरपाई देण्यात येते. आतापर्यंत या योजनेद्वारे मच्छीमारांना 22 लाख 50 हजार, 850 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. 96 ऑलिव्ह रिडले, 52 ग्रीन टर्टल, 3 हॉक्सबिल कासवं आणि 1 लेदर बॅक कासवाची जाळय़ातून सुटका करून त्यांना जीवदान देण्यात आले आहे.
कांदळवन कक्षातर्फे मरिन गटाची स्थापना!
कांदळवन कक्षाने मरीन रिस्पॉन्डट गटाची स्थापना केली आहे. त्यात महाराष्ट्र वन विभागातील वन परिक्षेत्र अधिकारी, कांदळवन प्रतिष्ठानचे कर्मचारी, पशुवैद्यकीय डॉक्टर, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा समावेश असलेला हा गट विशेषतः समुद्री कासव आणि इतर सागरी प्राणी समुद्र किनाऱयावर जखमी अवस्थेत वाहून आल्यास वेगवान प्रतिसादासाठी एक शृंखला म्हणून प्रस्थापित करण्यात आला आहे. या गटाचा सागरी जीवांच्या रक्षणात मोठा हातभार लागू शकतो, असे कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी सांगितले.
जनजागृतीचे चांगले परिणाम!
पूर्वीच्या काळी किनारपट्टीवरील गावांमध्ये सागरी प्रजातींविषयी बरेच गैरसमज होते. यातून सागरी प्रजातींच्या संवर्धनात बाधा येत होती. आता कांदळवन विभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानमार्फत मच्छीमारांमध्ये दुर्मिळ सागरी जीवाप्रती मोठी जनजागृती करण्यात येते. याचे चांगले परिणाम दिसून येऊ लागले आहेत, अशी माहिती कांदळवन सहव्यवस्थापन समिती, कांदळवन विकास समितीचे सदस्य व मार्गदर्शक लक्ष्मण तारी यांनी सांगितले.









