गजानन तोडणकर / हर्णे
वातावरणातील बदलाचा परिणाम आता मत्स्य व्यवसायाला जाणवू लागला आहे. गेले महिनाभर संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील मत्स्य उत्पादनात अनाकलनीय घट झाल्याचे दिसत असून अनेक नौका बंदरात उभ्या करून ठेवल्याचे चित्र हर्णे, रत्नागिरीसह सातपाटी बंदरात दिसत आहे.
यावर्षी वारंवार उद्भवणाऱया वादळामुळे मच्छीमारीला ब्रेक लागला असला तरी अशा सागरी वादळानंतर मासळीची आवक वाढते, असा मच्छीमारांचा अनुभव आहे. मात्र यावेळी पथमच अशा सागरी वादळानंतर पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतच्या किनारपट्टीवर मासळीची आवक घटली आहे. मासळीच्या शोधत मच्छीमारांच्या नौका गोव्यापासून मुंबईपर्यंत 100-200 वाव आत जाऊनही जेमतेम दोन-तीन टप एवढीच मच्छी मिळत असल्यामुळे मच्छीमार चिंतेत पडला आहे. हर्णे बंदरातील 70 टक्के नौका यामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पालघर, सातपाटी उत्तन हे पापलेटचे मोठे मार्केट आहे. सुमारे 3000 वर लहान-मोठ्या नौका येथे मासेमारी करतात. मात्र मासळी मिळतच नसल्याने एक महिन्यापासून येथील तब्बल बहुतांश नौका बंद ठेवण्यात आल्याचे येथील मच्छीमार नेते रामकृष्ण तांडेल यांनी सांगितले. तर मालवण येथील मेघनाथ धुरी यांनीही मासळीच्या आवकेत मोठी घट झाली असून छोट्या नौकांना बांगडा मिळत असल्याचे सांगितले.
मत्स्य व्यवसायावर आलेल्या या संकटाचा परिणाम या व्यवसायावर अवलंबून असलेल्या बर्प, डिझेल, किराणा, जाळी विकेते आदी उद्योगांवरही झाला असून परिणामी ही साखळी विस्कळीत झालेली पहायला मिळत आहे.
बदलत्या हवामानाचा सागरी जीवांवर परिणाम
हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. सागरी वादळाचे वाढते प्रमाण, अवेळी पाऊस, तापमानातील वाढ या सर्वांचा सागरी जीवांवर परिणाम होतो. परिणामी मत्स्योत्पादनात घट होताना दिसत आहे. तसेच एलईडी, फास्टरसारख्या विनाशकारी मासेमारीवरही अंकुश लागायला हवा.
-बाळकृष्ण चोगले
मत्स्य व्यावसायिक, हर्णे बंदर
Previous Articleचिपळुणात कोर्ट फी स्टॅम्पच्या तुटवड्यामुळे गोंधळ!
Next Article दापोलीत पर्यटन स्थळांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त









