प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्ह्य़ात पावसाचा जोर दिवसागणिक वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्यापट्टय़ामुळे 19 ते 22 जुलै रोजी काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. राजापूर तालुक्यात एकजण पुरात वाहून गेला असून जिह्यात विविध ठिकाणी अंशतः नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. रस्ता व रेल्वे वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला आहे. दरड कोसलल्यामुळे आंबा घाट काही काळ बंद ठेवावा लागला होता.
पूरस्थिती ओसरल्याने नागरिकांनी टाकला सुटपेचा निःश्वास
रत्नागिरी तालुक्यात रविवारी अनेक भागात पूरजन्य स्थिती निर्माण झालेली होती. पावस, काजळी नदी किनारा परिसर पूराच्या पाण्याने वेढलेला होता. मात्र पावसाचा जोर सोमवारी काहीसा कमी राहिला. त्यामुळे ही पुरस्थिती ओसरल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता.
मंडणगडात तिडे मार्गावरील वाहतूक बंद, दोन घरांचे नुकसान
संततधार पावसामुळे तालुक्यात दोन घरांचे सुमारे 21 हजार रूपयांचे अंशतः नुकसान झाले आहे. टावली येथील पांडूरंग दौलत रक्ते यांच्या घराच्या छपराची पडझड होऊन 11 हजार 450 रूपयांचे तर अडखळ येथील संतोष कावणकर यांच्या पडवीची पडझड झाल्याने 9600 रूपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी तिडे-तळेघर रस्त्यावर पाणी आल्याने तसेच टाकेडे मार्गावर व दाभट फरशीवरून पाणी गेल्याने विन्हे-लाटवण रस्ता बंद ठेवण्यात आला होता.
खेडमध्ये पावसाचा रूद्रावतार कायम
खेडमध्ये जगबुडी, नारिंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. जगबुडीचे पाणी सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास मटण-मच्छी मार्केटनजीक घुसताच नजीकच्या रहिवाशांसह व्यापाऱयांची धावपळ उडाली. नारिंगी नदीच्या सभोवतालची भातशेती पुन्हा पाण्याखाली गेली. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत नदीपात्रात मासेमारीसाठी न जाण्याचे आवाहन केले. दिवसभर पावसाचा धुमाकूळ सुरूच राहिल्याने बाजारपेठेतही शुकशुकाट पसरला होता.
दापोलीत पावसाचा जोर कायम
दापोलीत पावसाने सोमवारीदेखील जोर कायम ठेवला आहे. रविवारी दाभोळ-बेंडलवाडी येथे जोशी यांच्या घराजवळ दरड कोसळून झालेल्या नुकसानाव्यतिरिक्त कोणत्याही आपत्तीची नोंद नाही. सलग पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. अनेकठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती.
राजापूरात पुन्हा पूर… रायपाटणमध्ये एकजण गेला वाहून
राजापूर तालुक्यात कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे तालुक्यात पुन्हा एकदा पुरस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी सकाळी अर्जुना नदीमध्ये रायपाटण गांगणवाडी येथून विजय शंकर पाटणे (70, खेड) वाहून गेले आहेत. कुवेशी येथे वहाळ फुटून एक घर आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात अन्य काही ठिकाणी पडझडीच्याही घटना घडल्या आहेत.
आठ दिवसांमध्ये तीन वेळा राजापूर शहराला पुराचा तडाखा बसला. सोमवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी होऊनही पूराचे पाणी जैसे थे होते. त्यामुळे शिवाजीपथ, बंदरधक्का, चिंचबांध, वरचीपेठ रस्ता पाण्याखाली होता. गुजराळी रस्त्यावरही पाणी होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.
रायपाटण गांगणवाडी येथे पूराच्या पाण्यात एकजण गेला वाहून
सोमवारी सकाळी अर्जुना नदीमध्ये रायपाटण गांगणवाडी येथून विजय शंकर पाटणे वाहून गेले आहेत. ते रायपाटण येथे आपल्या नातेवाईकांकडे आले होते. सकाळी घरी परतत असताना गांगणवाडी पुलावरून पूराच्या पाण्यातून पलिकडे जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले. नदीपात्रात त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली.
अनेक ठिकाणी पडझड
धाऊलवल्ली येथील पर्शुराम तानू राणे यांच्या घराजवळं दरड कोसळली आहे. धाऊलवल्ली तरबंदर येथे चिंचेच मोठे झाड पडल्याने धाऊलवल्ली ते नाटे रस्ता पुर्ण बंद आहे. धाऊलवल्ली आंबेलकर वाडी येथे मुख्य रस्ता खचल्याने धोका निर्माण झाला आहे. कुवेशी येथे वहाळ फूटून रवी राजापकर यांच्या घरामध्ये व मळय़ामध्ये पाणी भरल्याने मोठे नुकसान झाले आहे. डोंगर तलाठी कार्यालयाजवळील रस्त्यावर मातीचा ढीग येऊन साचल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. जेसीबीच्या सहाय्याने माती बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला.
धोपेश्वर खंडेवाडी येथील जमिनीला भेगा.. भुस्खलनाचा धोका…
राजापूर शहरानजीकच्या धोपेश्वर खंडेवाडी येथील जमिनीला मोठय़ा भेगा पडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी याठिकाणी भूस्खलनाची घटना घडली होती. शनिवारी खंडेवाडी येथील रस्ता आणि जमिनीला भेगा पडल्याचे निदर्शनास आले. गेले दोन दिवस सातत्याने या भेगा वाढत आहेत. त्यामुळे याठिकाणी भुस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत सदस्य सतिश खांबल, ग्रामसेवक मनोहर नवरे यांनी या भागाची पाहणी केली असून बांधकाम विभाग, तहसीलदार यांना माहिती देण्यात आली आहे. साखर कोंबे, भंडारवाडी येथील जमिनीचा भाग खचला असून लगतच्या घरांना धोका पोहचण्याची शक्यता आहे. गेल्या दिड महिन्यात जिह्यात 1 हजार 939.78 मिलीमीटर सरासरी म्हणजेच या हंगामातील एकूण पावसाच्या सुमारे 50 टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी 2020 मध्ये या कालावधीपर्यंत जिल्हत सरासरी 1 हजार 242.40 मिमि पर्जन्यमान झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी 700 मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात सोमवार 19 जुलै रोजी 130.99मिमी सरासरी पावसाची नोंद सकाळपर्यंत झालेल्या 24 तासांत झाली.