प्रतिनिधी / कुडाळ:
दक्षिण अरबी समुद्रामध्ये मध्यम ते प्रखर अशा उधाणाच्या परिक्रमणामुळे कमी उंचीचे ते मध्यम उंचीचे विखुरलेले ढग गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण कोकणावर जमा झालेले आहेत. परिणामतः दक्षिण कोकणामध्ये 4, 5 व 6 जानेवारी रोजी तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 7 जानेवारी रोजी काही ठिकाणी सोसाटय़ाचा वारा, विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र, मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आलेला आहे.
सद्यपरिस्थितीत आंबा व काजू पीक फुलोरा अवस्थेत असल्याने अचानक हवामान बदलामुळे आंबा काजू पिकाची विशेष काळजी घेण्याचे तसेच शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याचे व शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने आवश्यक पीक संरक्षण करण्याचे आवाहन मुळदे उद्यादविद्या महाविद्यालयाचे डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी केले आहे.









