प्रतिनिधी/ रत्नागिरी
तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतरही कोकणात सोसाटय़ाचा वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. या वादळी पावसाचा प्रभाव 23 मे पर्यंत कोकण व गोवा भागात कायम राहणार आहे. याबरोबरच 8 जूनपर्यंत मान्सूनचे कोकणात आगमन होण्याचा सुधारित अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
‘तौक्ते’ चक्रीवादळ कोकणातून पुढे सरकले असले तरी त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे सलग 3 दिवस हे वातावरण कायम आहे. पावसाने जिल्ह्य़ातील पाणीटंचाईचे संकट काहीसे दूर केले आहे. नदय़ा-नाले, विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यातच पुढील 4 दिवस म्हणजेच 23 मे पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
तौक्ते चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची वाटचाल सुकर झाल्याने मान्सून नेहमीपेक्षा लवकर भारतात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार, येत्या 3 ते 4 दिवसांत मान्सून अंदमानात स्थिरावेल व त्यानंतर केरळमार्गे 8 जूनपर्यंत कोकणात प्रवेश करण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
…









