मुंबई/प्रतिनिधी
कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता आरटीपीसीआर सक्ती नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. कोरोनामुळे राज्यसरकारने काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना लशीच्या दोन्ही मात्रा किंवा आरटीपीसीआर चाचणी अहवाल असल्याशिवाय प्रवेश देणार नसल्याचा निर्मणी घेतला होता. पण आता कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना लशीच्या दोन्ही मात्रा किंवा आरटीपीसीआर चाचणी सक्ती असणार नाही, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. तर, याबाबतची जबाबदारी संबंधित व्यक्ती आणि ग्रामकृती दलांवर टाकण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारी म्हणून कोकणात येणार्या चाकरमान्यांना लशीच्या दोन मात्रा किंवा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. ग्रामीण भागातील ग्राम कृती दलांना त्यानुसार तपासणीच्या सूचना देखील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गावांमध्ये गोंधळ किंवा वाद होण्याची शक्यता होती. रेल्वेस्थानकांवरही काही ठिकाणी आरटीपीसीआर किंवा अॅन्टीजेन चाचण्यांची व्यवस्था केली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत यांनी हा खुलासा केला. यावेळी बोलताना कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना लशीच्या दोन्ही मात्रा किंवा आरटीपीसीआर चाचणी सक्ती असणार नाही, असे सांगितले.