अक्षत याला नासाकडून प्राप्त झाले प्रमाणपत्र
मनोज पवार/दापोली
लॉकडाऊनच्या काळात घरीच असलेल्या जगभरातील खगोल प्रेमींसाठी नासाने दिलेला टास्क पूर्ण करून कोकणातील दोन युवकांनी चार नवीन लघुग्रह शोधून काढले आहेत. लॉकडाऊनच्या वेळेचा सदुपयोग करून त्यांनी कोकणचे नाव जगाच्या पटलावर नेऊन ठेवले आहे. या दोन्ही युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.दापोलीतील शिवाजीनगर येथे आजोळ असणाऱ्या अक्षत मोहिते व पेण हे मुळगाव असणारा प्रज्ञेश म्हात्रे यांनी ही किमया केली आहे.
अक्षत मोहिते हा सध्या नासामध्ये शास्त्रज्ञ म्ह्णून नोकरी करत आहे. तो केवळ 19 वर्षांचा आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अक्षत हा त्याच्या ठाणे येथील घरी अडकला आहे. या लॉकडाऊनच्या काळात नासाने जगभरातील अंतराळ प्रेमींकरिता व खगोल अभ्यासकांना करिता एक योजना राबवली होती. या योजनेला नासाने इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल सर्च कोलॅबरेशन असे नाव देखील दिले होते. भारतातून या शोध मोहिमेचे प्रतिनिधित्व टीम ऑलॉम्पस यांनी केले. या टीममध्ये अक्षत मोहिते व त्याचा मित्र प्रज्ञेश म्हात्रे हा होता. यांना नासाकडून अंतराळाचा सॅटेलाईट व टेलिस्कोपच्या माध्यमातून घेतलेल्या रेडिओ इमेज डेटा पुरवण्यात आला होता. या डेटामध्ये अंतराळातील तब्बल 150 फोटो या दोघांनी अभ्यासले. हे फोटो काळे-पांढरे व ठिबके या प्रकारात होते. उपग्रह देत असणाऱ्या फोटोंच्या सहाय्याने त्यांना अंतराळातील नवीन उपग्रह शोधून काढायचे होते.

हे काम इतके किचकट, वेळकाढू व डोळे फोडणारे असते की एखाद्या फोटोवर क्लिक केल्या नंतर उपग्रहाने जागा थोडी जरी बदलली तरी फोटो पुढे सरकतो. यातून अ, ब पोझिशन तयार होते. यामुळे पुन्हा त्या फोटोवर क्लिक करुन पुन्हा झुम करुन उपग्रहाने जागा बदलण्याआधी पुन्हा त्यावर अभ्यास करावा लागतो. अशा पद्धतीने त्यांनी 14 एप्रिल ते 12 मे या कालावधीत पीआरए-001, पीआरए-002, पीआरए-003, पीआरए-004 असे चार नवीन उपग्रह शोधून काढले.
या लघुग्रहांना नासाने मान्यता देखील दिली असून त्यांचे कौतुक देखील केले आहे. तसे प्रमाणपत्र देखील अक्षत व प्रज्ञेश यांना मेल केली आहेत. शिवाय या नव्याने शोधून काढलेल्या लघुग्रहांची माहिती नासाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर देखील लोड केली आहे. याबाबत बोलताना अक्षय याने आपण भारतीय असल्याचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली.









