सिंधुदुर्गातील अनंत प्रभुआजगावकर यांनी विकसीत केली लाल भेंडीची जात
वार्ताहर/ राजापूर
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सावंतवाडी, आजगाव येथील संशोधक शेतकरी अनंत दिगंबर प्रभु आजगावकर यांनी सुमारे चौदा वर्षाच्या अथक परिश्रमाने लाल भेंडीची नवी जात विकसीत केली आहे. याची दखल केंद्र शासनाने घेतली आहे. देशभरात विविध चाचण्या झाल्यानंतर त्यांना या प्रजातीसाठी स्वामित्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातून असा बहुमान मिळालेले ते पहिले शेतकरी आहेत.
मुळ सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील व सध्या वेंगुर्ला येथे वास्तव्याला असणारे अनंत दिगंबर प्रभु आजगावकर यांना सुमारे 15 वर्षापूर्वी स्थानिक हिरव्या-पांढऱया भेंडीमध्ये काही भागात लालसर छटा आढळली. त्यामुळे त्यांचे कुतूहल जागृत झाले. या भेंडीचे बियाणे त्यांनी वेगळे लावले. चिकाटीने वर्षानुवर्षे अशी लागवड व प्रयोग करत राहिले. टप्प्याटप्याने लालसर छटांचे प्रमाण वाढत गेले. अखेरीस त्यांनी पूर्ण लाल भेंडीची उत्तम जात विकसीत केली.
या लाल भेंडीमध्ये चिकटपणा कमी आहे. तसेच ती पौष्टीक आहे. त्यामुळे बाजारात या भेंडीला जास्त मागणी आहे. भेंडीचा रंग लालसर असून लांबी 7 ते 8 इंच आहे. तसेच प्रती झाड उत्पन्न 1 ते दीड कीलो आहे. याची लागवड मे महिनच्या शेवटच्या आठवडय़ात व उन्हाळय़ात जानेवारीच्या अखेरीस करावी, पीक कालावधी 120 ते 130 दिवसांचा आहे. काढणी सुरू व्हायला 40 ते 45 दिवस लागता. ही प्रतिकूल तापमान सहन करू शकते. जम्मू काश्मिर हा अतिथंड हवामानाचा प्रदेश वगळता संपूर्ण देशात या जातीची लागवड करता येते.
या नव्या जातीकरीता आजगावकर यांना केंद्र शासनाकडून स्वामित्व प्रदान करण्यात आले आहे. वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात डॉ. बी. एन. सावंत यांच्याहस्ते आजगावकर यांना नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रभु आजगावकर यांनी त्यांनी केलेल्या प्रयोगाची यशोगाथा सविस्तर उलगडून सांगितली. तसेच यापुढेही असे कार्य करणार असल्याचे सांगितले. समाजकल्याण विभागाचे उप आयुक्त प्रमोद जाधव यांनी फारशा सोयी सुविधा नसताना एका छोटय़ाशा खेडय़ातील शेतकऱयाने केलेल्या कामाची प्रशंसा केली. तसेच शेती कंटाळवाणी नसून हे यश, आनंद व समाधान देणारे काम असल्याचे सांगितले.
डॉ. विजयकुमार देसाई यांनी लाल भेंडीची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉ.सावंत यांनी विद्यापीठाने यापूवीं केलेल्या सहकार्याची व नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली. तसेच यापुढेही शेतकऱयांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली. कोकण कृषी विद्यापीठातील डॉ. व्ही. व्ही. दळवी, डॉ. पराग हळदणकर यांचे महत्वपूर्ण सहकार्य या नोंदणीसाठी मिळाले. प्रभु आजगावकर यांना मिळालेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.









