प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणातल्या कार्यकर्त्याला भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी स्तरावर काम करण्याची प्रथमच संधी मिळाली आहे. भाजपाच्या या विश्वासाला तडा जाऊ न देता हे मी आपले कार्य करत राहणार. त्यावेळी कोकणातल्या माणसाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचवण्याचे काम नक्की करणार असल्याचे राज्याचे माजी शिक्षण मंत्री व भाजपाचे विद्यमान राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी केले.
राष्ट्रीय चिटणीसपदाची जबाबदारी आल्यानंतर विनोद तावडे प्रथमच रत्नागिरी येथे सोमवारी आले होते. त्याचे औचित्य साधत रत्नागिरी भाजपातर्फे तावडे यांच्या सत्काराचा कार्यक्रम रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय, रत्नागिरी येथील सभागृहात झाला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन (दक्षिण विभाग), रत्नागिरी-सिंधुदुर्ग संघटनमंत्री शैलेंद्र दळवी, महिला आघाडी अध्यक्षा ऐश्वर्या जठार, शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, भाजपा युवाचे विक्रम जैन आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थिततांच्या उपस्थितीत ऍड. दीपक पटवर्धन यांच्याहस्ते तावडे यांचा शाळ, श्रीफळ व विठोबाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय चिटणीस तावडे म्हणाले की, घरातल्या माणसांनी केलेला सत्कार, दिलेल्या शुभेच्छा महत्वाच्या व मनापासून दिलेल्या असल्याचा आर्वजून उल्लेख केला. येणाऱया अडचणींच्या काळात या महत्वाच्या ठरतात. सन 1980 पासून सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर भाजपा विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून 1985 ते 95 पर्यंत काम केले. त्यानंतर पक्षाने विविध जबाबदाऱया सोपवल्या. महाराष्ट्रातील मागील 25 वर्षाच्या राजकारण, सत्ताकारणात अनेक अनुभव आले. त्याचा माझे आयुष्य प्रगल्भ करण्यास झाला. त्यातून खूप काही शिकता आल्याचे तावडे यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी देशाचे नेतृत्व सांभाळणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची स्तुती केली. आज देशाला अशा नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी तावडे यांच्या संघटनात्मक कौशल्याविषयी बोलताना सांगितले की, तावडेंचा जिल्हय़ात सातत्याने राजकीय संपर्क राहिलेला आहे. संघटन हे भाजपात मोठे कार्य आहे. त्यामुळे तावडे यांनी व्यक्तीगत संपर्कातून येथील कार्यकर्त्यांना जोडलेले आहे. आजही येथील कार्यकर्त्यांना आधार देत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. मार्गदर्शनासाठी येथील कार्यकर्ता आजही भुकलेला आहे. त्यांनी जिल्हय़ात सातत्याने यावे, येणाऱया निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने भाजपाला निवडूनआणण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करावे, अशी साद घातली आहे. त्यावेळी नव्या व जुन्यांचा समन्वय साधून संघटना पुढे न्यायची असल्याचे ऍड. पटवर्धन यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन वहाळकर यांनी केले. तर सूत्रसंचालन उमेश कुलकर्णी यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे पदाधिकाऱयांच्याहस्ते स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला सोशल डिस्टन्सिंग ठेवून भाजपाच्या कार्यकर्ते, इतर पदाधिकाऱयांची उपस्थिती होती.