प्रतिनिधी/ मंडणगड
दापोली मतदार संघासह कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूल व बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. कोरोना महामारीचे संकट संपल्यावर मंडणगड तालुक्याला पायाभूत, मूलभूत सुविधांसाठी ग्रामविकास खात्यामार्फत भरघोस निधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सावित्री नदीवरील म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतुकीस पर्याय देणाऱया फेरीबोट जेटी कामाच्या गुरूवारी म्हाप्रळ येथे आयोजित भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोकणावर विशेष प्रेम असून कोकणच्या विकासासाठी पहिलं प्राधान्य ते देत आहेत. तसेच रामदास कदम यांचा उल्लेख करताना ‘टायगर अभी जिंदा है’ म्हणत त्यांच्या नियोजनबद्ध कामाचे कौतुक केले. कदम यांनी राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांची कामेच त्यांची ओळख आहे, असेही सत्तार म्हणाले. यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या आघाडीबाबतच्या प्रश्नावर राज्यमंत्री सत्तार यांनी महाविकास आघाडी ही फेविकॉलसारखी मजबूत असून भविष्यात महाआघाडीतील घटक पक्षांची मोट आणखी घट्ट होणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या विकासासाठी आग्रही असणारे स्थिर सरकार आम्ही देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. याच प्रश्नावर आमदार योगेश कदम यांनी भूमिपूजन कार्यक्रम प्रोटोकॉलनुसार शासकीय असून महाआघाडीत बिघाडी नसून स्थानिक पातळीवरील घटकपक्षातील सर्वच कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच कार्यक्रम सुरु असल्याचे सांगितले.
यावेळी पंचायत समिती सभापती स्नेहल सकपाळ, उपसभापती प्रणाली चिले, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, शहरप्रमुख विनोद जाधव, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मुश्ताक मिरकर, समद मांडलेकर, जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे, शशिकांत चव्हाण, अस्मिता केंद्रे, संतोष मांढरे, सिमाब मुकादम, अस्लम मुकादम, शंकर म्हाप्रळकर, सिद्धेश देशपांडे, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता मोहिते, उपभियंता मंजुळे आदी उपस्थित होते.









