भाजप कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्धार, मडगाव मतदारसंघात यावेळी कमळ फुलण्याचा विश्वास
प्रतिनिधी /मडगाव
भाजपचे मडगावातील उमेदवार बाबू आजगावकर यांना कोंबमधील एकूण मतांपैकी 70 टक्क्मयांपेक्षा जास्त मते मिळवून देण्याचा निर्धार भाजपच्या कोंबमधील कार्यकर्त्यांनी केला आहे. कोंब येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी हा निर्धार केला. यावेळी उपमुख्यमंत्री व उमेदवार बाबू आजगावकर, भाजपच्या मडगाव मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे, भाजपचे प्रवक्ते शर्मद रायतूरकर, मडगाव मंडळाचे माजी अध्यक्ष चंदन नायक, राज्य कार्यकारिणी सदस्या रंजिता पै, नगरसेविका डॉ. सुशांता कुरतरकर, माजी नगरसेवक केतन कुरतरकर व कोंब येथील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
आजगावकर यांच्या रूपाने मडगावधील मतदार व कार्यकर्त्यांना कणखर व कार्यक्षम नेता लाभला आहे. मडगाव शहरावर गेली अनेक वर्षे झालेल्या अन्यायामुळे आलेले नैराश्य झटकून कार्यकर्ते नेटाने कामाला लागले असून याखेपेस मडगावात भाजपचे कमळ नक्की फुलेल, असा विश्वास रायतूरकर यांनी व्यक्त केला. कोंबमध्ये आघाडी मिळवणारा उमेदवारच मडगावात जिंकून येत असल्याचा इतिहास असून याखेपेस आजगावकरांना कोंबमधून 70 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांत हुरूप : महात्मे
कोंबमधील मतदार सूज्ञ व सामाजिक भान असणारे आहेत. हे मतदार विरोधकांकडून चालवण्यात येणाऱया कोणत्याही अपप्रचाराला बळी पडणार नाहीत. अनेक सामाजिक चळवळींचे नेतृत्व केलेल्या कोंबमधून यावेळी आजगावकर यांना भरघोस मते मिळतील, असे नायक यांनी सांगितले. आजगावकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्यामुळे मडगावमधील कार्यकर्त्यांत हुरूप आला आहे. याखेपेस मडगावात भाजपचेच वारे असेल, असे महात्मे यांनी सांगितले. आजगावकर यांनी पेडणे मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले असले, तरी मडगावबद्दल त्यांना नेहमीच तळमळ होती. काम करण्याच्या त्यांच्या धडाडीचा मडगावकरांना लाभ होईल, असे केतन कुरतरकर यांनी सांगितले.
आजगावकर हे मडगावचे माजी नगरसेवक असून नगरसेवक म्हणून त्यांनी केलेले कार्य मडगावकरांच्या स्मरणात आहे. विकासाबाबत मडगावची अनेक वर्षे झालेली उपेक्षा दूर करण्याची क्षमता आक्रमक कार्यशैलीबद्दल प्रसिद्ध असलेल्या आजगावकर यांच्याकडे आहे, असे रंजिता पै यांनी सांगितले. राजकीय कारकिर्दीची सुरुवात मडगावमध्येच नगरसेवक म्हणून केली होती. आज पुन्हा या दामबाबाच्या स्थळात मडगावकरांच्या सेवेसाठी आपण रूजू होत असून कार्यकर्ते व अन्य मडगावकरांना बरोबर घेऊन मडगावचा विकास घडवून आणणार, असे आजगावकर यांनी सांगितले.









