कोणाला कशाचा शौक असेल ते सांगता येत नाही. पंजाबमधील लुधियाना जिल्हय़ातील समराला या गावी आजादसिंह नामक एका विक्षिप्त शौकिनाने आपल्या कोंबडय़ाला सोन्याची भीकबाळी घातली आहे. या भीकबाळीमुळे आपला कोंबडा गावातील सर्व कोंबडय़ापेक्षा सुंदर दिसतो, असा त्याचा दावा आहे.
आजादसिंह कात्री आणि चाकू इत्यादी वस्तूंना धार लावण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. त्याने कोंबडय़ाही पाळल्या आहेत. त्याची आर्थिक परिस्थिती बेतासबात अशीच आहे. तरीही पै पै साठवून त्याने आपल्या लाडक्या कोंबडय़ासाठी सोन्याची भीकबाळी करून घेतली. याबद्दल त्याची कुटुंबीयांकडून आणि मित्रांकडून येथेच्छ चेष्टाही झाली. तथापि त्याने त्याकडे लक्ष न देता कोंबडय़ाला सुंदर बनविण्याची आपली हौस अशा प्रकारे भागवून घेतली.
आजादसिंह याचे ध्येय आता कोंबडय़ाच्या दुसऱया कानातही असेच कर्णभूषण घालण्याची आहे. यासाठी त्याने पैसे साठविण्यास प्रारंभही केला आहे. लवकरच आपण कोंबडय़ाच्या दोन्ही कानात भीकबाळी घालू असे तो म्हणतो. हौसेला मोल नसते हेच खरे असे आता त्याच्याबद्दल गावकरी बोलताना दिसतो.









