विधीविज्ञान प्रयोगशाळेतील तज्ञांचा निर्वाळा
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 15 दिवसांपूर्वी कोंडसकोप्प (ता. बेळगाव) जवळील हणमंतवारी परिसरात आढळून आलेली मानवी कवटी पुरुषाची असल्याचे विधीविज्ञान प्रयोगशाळेतील तज्ञांनी तपास अधिकाऱयांना सांगितले आहे. आता ही कवटी कोणाची? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस दलासमोर उभे ठाकले आहे.
30 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी हणमंतवारीच्या गवताळ जमिनीत मानवी कवटी व हाडे आढळून आली होती. त्याच दिवशी हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात भा.दं.वि. 302, 201 कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र केवळ कवटी आणि हाडांवरून पुरुष की स्त्राr? हे ठरविणे अवघड होते.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या मार्गदर्शनाखाली हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. पोलिसांनी मानवी कवटी आणि हाडे विधीविज्ञान प्रयोग शाळेला पाठविले होते. तज्ञांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली होती.
या संबंधीचा प्राथमिक अहवाल तपास अधिकाऱयांना उपलब्ध झाला असून हाडे व मानवी कवटी पुरुषाची आहेत. 35 ते 40 वयोगटातील युवकाची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याचा संशय आहे. ही कवटी महिलेची की पुरुषाची हा संभ्रम सुरू झाला होता. परंतु आता खून झालेला युवक कोण? याचा शोध घ्यावा लागणार आहे.
उपलब्ध माहितीनुसार मानवी कवटी व हाडे विधीविज्ञान प्रयोग शाळेला पाठविण्यात आले आहेत. डीएनएचे नमुने राखून ठेवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर एखाद्या बेपत्ता व्यक्तीविषयी माहिती मिळाली किंवा संशय आला तर कुटुंबीयांच्या डीएनए तपासणीवरून ही कवटी कुणाची याचा शोध घेता येणार आहे.









