वार्ताहर/ माखजन
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर उजाडला तरी शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्याचा परिणाम अकरावी प्रवेशावर झाला आहे. संगमेश्वर तालुक्याच्या उत्तरेकडील माखजन वगळता आरवली, तुरळ व कडवई येथील कनिष्ठ महाविद्यालयात जेमतेम सरासरी 10 ते 15 मुलांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दहावीचा निकाल जाहीर होऊन 20 दिवस उलटले तरी अजून काही विद्यार्थी गुणपत्रिका व शाळा सोडल्याचा दाखला नेण्यास शाळेकडे फिरकलेले नाहीत.
आरवली परिसरात आरवली, माखजन, तुरळ, कडवई येथे माध्यमिक विद्यालये आहेत. या विद्यालयानांच कला व वाणिज्य शाखेची कनिष्ठ महाविद्यालये जोडलेली आहेत. माखजन येथील ऍड. पी. आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयात कला व वाणिज्य व विज्ञान, आरवलीत श्री देव केदार कनिष्ठ महाविद्यालयात कला व वाणिज्य, तुरळ येथे देवरूखकर कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य तर कडवईत कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान, कला व वाणिज्य शाखा आहेत.
माखजन येथील महाविद्यालयात 3 शाखेत 130 मुलांनी प्रवेश घेतला आहे. कडवईतील महाराष्ट्र, ऊर्दू हायस्कूलने विज्ञान शाखेचे वर्ग उघडले आहेत. तेथील प्राचार्य कारिगर म्हणाले की, सध्या अकरावी वर्गात 25 मुलांनी प्रवेश घेतला आहे. तुरळ कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील म्हणाले, कोरोनामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या तरी शिक्षण सुरु आहे. मात्र अनेक मुले दहावीची गुणपत्रिका व दाखले नेण्यास आलेली नाहीत. केवळ 5 मुलांनी अकरावीसाठी प्रवेश, अर्ज नेले आहेत. आरवलीतील कनिष्ठ महाविद्यालयाची अवस्था अशीच आहे. ही महाविद्यालये ग्रामीण भागात व विनाअनुदानित असल्याने 11वी प्रवेशासाठी फारशी चुरस नाही. सहज प्रवेश मिळून जाईल, अशी मुलांची धारणा झाली आहे. त्यामुळे कदाचित मुलांनी महाविद्यालयाशी संपर्क साधला नसावा. शाळा सुरू झाल्यानंतर प्रवेशासाठी झुबंड उडेल, असे पालक विलास डिके यांनी सांगितले. शाळा कधी सुरू होतील, या बाबत अनिश्चितता असल्याने माध्यमिक शाळांमध्येही नवीन प्रवेश कमी प्रमाणात झाले आहेत. एकंदरीत शिक्षण क्षेत्रात मरगळ आल्याचे चित्र समोर येत आहे.