मागच्या वर्षी 33 हजारांची भरती :उत्पन्न 18 अब्ज डॉलर्सवर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
अमेरिकेतील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा देणारी कंपनी कॉग्निझंट यंदा डिसेंबर 2022 पर्यंतच्या काळामध्ये भारतामध्ये 50000 जणांची भरती करणार असल्याची माहिती आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भरती करण्याची ही कंपनीची पहिलीच वेळ आहे.
मागच्या वषी कंपनीने 33000 जणांना कंपनीमध्ये नव्याने सामावून घेतलं होतं. अमेरिकेतील शेअर बाजार नॅसडॅकमध्ये सदरची कंपनी लिस्टेड असून 2021 मध्ये विक्रमी 33 हजार जणांना कंपनीने भरती केलं होतं. परंतु दुसरीकडे नोकरी सोडणाऱयांचे प्रमाण या कंपनीतच अधिक असल्याची बाबही समोर आली आहे.
नोकरी सोडणाऱयांचे प्रमाण अधिक
मागच्या वषी 33 टक्के कर्मचाऱयांनी नोकरी सोडली होती. या तुलनेमध्ये पाहता इतर आयटी कंपन्यांमधून कमी प्रमाण कर्मचारी नोकरी सोडण्याचे दिसून आले आहे. इन्फोसिसमधून 25 टक्के, विप्रोमधून 22 टक्के, टेक महिंद्रामधून 24 टक्के, टीसीएसमधून 15 टक्के आणि एचसीएल टेक मधून 19 टक्के कर्मचाऱयांनी डिसेंबरच्या तिमाहीत नोकरी सोडली असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. कॉग्निझंट इंडियाचे चेअरमन राजेश नंबियार यांनी म्हटले की, डिसेंबर तिमाहीमध्ये जास्तीत जास्त कर्मचाऱयांनी नोकरी सोडलेली असली तरी तिमाहीच्या आधारावर पाहता काहीसा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱयांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण कमीत कमी राहील यासाठी कंपनी प्रयत्न करते आहे.
उत्पन्न पहिल्यांदाच दोन अंकी वाढले
दुसरीकडे कंपनीने 2021 मध्ये उत्पन्नामध्ये 10 टक्के वाढ दर्शविली आहे. 18.5 अब्ज डॉलर्स उत्पन्न कंपनीने मागच्या वषी प्राप्त केले आहे. प्रथमच दोन अंकी विकास साधला आहे.
क्लियर ट्रिप करणार
40 टक्के भरती
कोरोनाचा परिणाम ढिला पडला असून उद्योग व्यवसाय आता जोमाने सुरू झाले आहेत. दुसरीकडे आता ऑनलाइन ट्रव्हल क्षेत्रातील कंपनी क्लियर ट्रिपने आपल्या कर्मचाऱयांच्या संख्येत तिमाहीत 60 टक्के वाढ केली असून येत्या तिमाहीत आणखी 40 टक्के जादा कर्मचारी भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत एकूण कर्मचाऱयांची संख्या 700 वर पोहोचणार आहे. ऑक्टोबर 2021 पर्यंत कंपनीकडे 240 कर्मचारी होते. तंत्रज्ञान, उत्पादन व इतर विभागात भरती केली जाईल.









