‘आझादी का अमृत महोत्सव’ निर्णय घेणार केंद्र सरकार
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिला तसेच ट्रान्सजेंडर दोषींची शिक्षा टप्पाबद्ध पद्धतीने कमी करण्याची योजना आखत आहे. परंतु याकरता संबंधित महिला अन् ट्रान्सजेंडर कैद्यांचे वर्तन चांगले राहिलेले असणे आवश्यक आहे.
स्वतःच्या शिक्षेचा निम्म्याहून अधिक काळ पूर्ण केलेल्या 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पुरुष तसेच दिव्यांग कैद्यांनाही या योजनेचा लाभ सरकार देणार आहे. तर शिक्षा पूर्ण केलेले परंतु पैशांअभावी दंड न भरू शकलेल्या गरीब किंवा निर्धन कैद्यांना आर्थिक दंडापासून सूट देण्यात येणार आहे. मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांवर मात्र ही योजना लागू होणार नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच बलात्कार, दहशतवाद, हुंडाबळी किंवा मनी लॉन्ड्रिंगचे आरोप असलेल्या कैद्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
2020 मधील एका अधिकृत अनुमानानुसार भारतातील तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. देशातील तुरुंगांमध्ये 4.03 लाख कैद्यांना सामावण्याची क्षमता आहे, परंतु सध्या तुरुंगांमध्ये 4.78 लाख कैदी असून यात सुमारे 1 लाख महिलांचा समावेश आहे.
संबंधित निकष पूर्ण करणाऱया कैद्यांना तीन टप्प्यांमध्ये 15 ऑगस्ट 2022, 26 जानेवारी 2023 आणि 15 ऑगस्ट 2023 रोजी मुक्त करण्यात येणार असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कळविले आहे.
50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला तसेच ट्रान्सजेंडर कैदी, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे पुरुष कैदी, 70 टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या कैद्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱया योजनेनंतर मुक्त केले जाऊ शकते, परंतु याकरता शिक्षेचा निम्म्याहून अधिक कालावधी संपलेला असावा तसेच त्यांचे वर्तन चांगले राहिलेले असावे असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
नागरी तसेच पोलीस अधिकाऱयांच्या राज्यस्तरीय चौकशी समितीकडून सखोल पडताळणी केल्यावर कैद्यांच्या मुक्ततेचा विचार करण्यात यावा. शिक्षेचा निम्म्याहून अधिक काळ पूर्ण केलेल्या ज्या कैद्यांनी वयाच्या 18-12 वर्षांदरम्यान गुन्हा केला असेल आणि त्यांच्या विरोधात अन्य कुठलाही गुन्हा नसल्यास त्यांचाही विशेष सूट साठी विचार करण्यात येणार असल्याचे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले.









