प्रतिनिधी / उस्मानाबाद
राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथे दि.६ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राज्यासह देशाच्या कानाकोपर्यातून शेतकरी व पदाधिकारी येणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटूरे यांनी केले आहे.
राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे पहिले अधिवेशन केशेगाव येथे होत असून या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर खल करण्यात येणार असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घेण्यात येणार आहे. बरोबरच समाजाच्या तळागळातील मजूर, मागासवर्गीय घटक, कामगार व विद्यार्थी तसेच सुशिक्षित बेकारांची करण्यात येत असलेली फसवणूक व फरपट सत्ताधारी ज्या पद्धतीने धोरणे राबवून त्यांना वेठीस धरत आहेत. यासह समाज घटकाच्या सर्व प्रश्नाबाबत या अधिवेशनात रणनीती ठरवून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत.









