रॉकस्टारचे चाहते त्याच्याशी संबंधित गोष्ट लाखो-कोटय़वधी रुपयांमध्ये खरेदी करत असतात. कर्ट कोबेन या रॉकस्टारने 1994 मध्ये जगाचा निरोप घेतला होता. पण त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. कर्टचे 6 केस लिलावात विकले गेले आहेत. त्याच्या केवळ 6 केसांसाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी दिसून आली आहे.
केली होती आत्महत्या
अमेरिकेतील गायक, गीतकार, गिटारिस्टसह कोबेनचा एक बँड देखील होता. याचे नाव निर्वाणा बँड होते, तो याचा प्रमुख होता. केवळ वयाच्या 27 व्या वर्षी 5 एप्रिल 1994 रोजी त्याने आत्महत्या केली होती. त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली होती.
लिलावात केसांची विक्री
आयकॉनिक ऑक्शन्समध्ये 14145 डॉलर्स म्हणजेच सुमारे 10 लाख रुपयांमध्ये कर्टचे 6 केस विकले गेले आहेत. मागील अनेक वर्षांपासून या केसांना प्लास्टिकच्या आवरणात सांभाळून ठेवण्यात आले होते. निर्वाणाचा फर्स्ट अल्बम प्रदर्शित झाल्याच्या चार महिन्यांनी कर्टने केस कापून घेतले होते. त्याचा हा अल्बम सुपरहिट ठरला होता आणि तो मोठा स्टार झाला होता. कर्टचा हा हेअरकट त्यांची मैत्रिण टेसा ओसबॉर्न यांनी ऑक्टोबर 1989 मध्ये इंग्लंडमध्ये केला होता.
44 कोटींमध्ये गिटारची विक्री
मागील वर्षी जूनमध्ये कर्ट यांच्या प्रसिद्ध गिटारचाही लिलाव झाला होता. हा गिटर 6 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 44 कोटी रुपयांच्या विक्रमी किमतीत लिलावात विकला गेला होता. आतापर्यंत कर्टचा हा गिटार जगातील सर्वात महागडा गिटार आहे. तर त्याच्या एका इन्शोरन्स लेटरचाही लिलाव करण्यात आला होता. या पत्रावर कर्टने पूर्ण स्वाक्षरी केली होती. कर्टने कुठल्याही दस्तऐवजावर पूर्ण स्वाक्षरी केल्याचे प्रकार खूपच कमी होते. अशा स्थितीत हे पत्र दुर्लभ ठरले होते.
स्वतःच्या जीवनाच्या अखेरच्या दिवसांमध्ये कर्ट हेरॉइनचे सेवन आणि नैराश्याला तोंड देत होता. वयाच्या 27 व्या वर्षी मृत्यू होण्यापूर्वी कर्टने स्वतःच्या संगीताच्या मदतीने ऑल्ट रॉकच्या जगतातील सर्वात प्रभावशाली रॉकस्टार्स म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती.









