अलाहाबाद उच्च न्यायालयाची टिप्पणी जोधा-अकबरचे दिले उदाहरण
@ वृत्तसंस्था / प्रयागराज
उत्तरप्रदेशात लव्ह जिहादच्या कथित वाढत्या घटनांदरम्यान आता या पूर्ण घटनाक्रमात अकबर आणि जोधाबाई यांच्या किस्स्याची एंट्री देखील झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने केवळ विवाहासाठी धर्मांतर करण्यावर चिंता व्यक्त केली आहे.
एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुघल बादशाह अकबर आणि जोधाबाई यांचे उदाहरण देत धर्मांतरापासून वाचण्याचा सल्ला दिला. अकबर-जोधाबाईंच्या प्रकरणाचा धडा घेत धर्मांतराच्या अनावश्यक घटना टाळता येऊ शकतात असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अकबर-जोधाबाई यांनी धर्मांतर न करता विवाह केला, परस्परांचा सन्मान केला आणि धार्मिक भावनांचाही आदर केला. दोघांच्या कथित नात्यात कधीच धर्म आडवा आला नसल्याचे न्यायालयाकडून म्हटले गेले. उत्तरप्रदेशच्या एटा जिल्हय़ातील रहिवासी जावेद याच्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान धर्म श्रद्धेचा विषय असतो, तो तुमची जीवनशैली दर्शवित असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
वैयक्तिक लाभासाठी धर्मांतर नको
ईश्वराबद्दल श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कुठलीही विशेष पूजा पद्धत असणे आवश्यक नाही. विवाह करण्यासाठी समान धर्मांचे असणेही आवश्यक नाही. अशा स्थितीत केवळ विवाह करण्यासाठी धर्मांतर करणे पूर्णपणे गैर आहे. अशाप्रकारच्या धर्मांतरामध्ये धर्माकरता कुठलीच श्रद्धा नसते. हा निर्णय नेहमीच दबाव, भीती आणि आमिषापोटी घेतला जातो. केवळ विवाहासाठी करण्यात आलेले धर्मांतर चुकीचे असते आणि याची कुठलीच घटनात्मक मान्यता नसते. वैयक्तिक लाभासाठी करण्यात आलेले धर्मांतर देश आणि समाजासाठी धोकादायक असते. अशाप्रकारच्या धर्मांतराच्या घटनांमुळे फुटिरवादी शक्तींना बळ मिळत असल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.









