केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा – घुसखोर हीच काँग्रेस अन् बदरुद्दीन यांची मतपेढी
वृत्तसंस्था/ कोक्राझार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नालबारी (आसाम)मध्ये ‘विजय संकल्प समावेश’ कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे. काँग्रेस आणि बदरुद्दीन अजमल आसाममधील घुसखोरी रोखू शकतात का? काँग्रेस आणि बदरुद्दीन ही जोडी सर्व दरवाजे उघडून घुसखोरांना मैदान मोकळे करून देतील कारण तेच त्यांची मतपेढी आहेत. आसाममध्ये केवळ भाजपच घुसखोरी रोखू शकत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काँग्रेसकडून अनेकदा भाजपवर सांप्रदायिक असल्याचा आरोप केला जातो, पण केरळमध्ये मुस्लीम लीगसोबत कोण आघाडी करत आहे आणि आसाममध्ये बदरुद्दीन अजमल यांना कुणी सोबत घेतले आहे याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. धर्मांधांशी आघाडी करणारा हा कुठला धर्मनिरपेक्ष पक्ष अशा शब्दांत शाह यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
उग्रवाद रोखण्यास काँग्रेस अपयशी
बोडोलँड टेरिटोरियल रिजन (बीटीआर) कराराने ईशान्येत उग्रवाद समाप्त करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात केली आहे. तर काँग्रेसने भूतकाळात विविध उग्रवादी संघटनांसोबत अनेक करारांवर स्वाक्षऱया केल्या, पण आश्वासनांची पूर्तता करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
बोडो कराराची पूर्तता करणार
पंतप्रधान मोदी आणि भाजप बीटीआर करारातील सर्व तरतुदी पूर्ण करण्यास प्रतिबद्ध आहे. भाजप सरकारमध्ये आसाममधील सर्व समुदायांचे राजकीय अधिकार, संस्कृती आणि भाषा सुरक्षित आहेत. मोदींनी एक लाखांहून अधिक स्थानिक वंशाच्या लोकांना जमिनीचे पट्टे प्रदान केले आहेत. राज्य सरकारने बोडोला आसामची उपभाषा ठरविले आहे. राज्यातील समृद्ध संस्कृती, भाषा आणि वारशाचे रक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे शाह यांनी म्हटले आहे.









