आंतरराज्य सीमा बंद करणार नाही : अश्वथनारायण
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना व ओमिक्रॉनचा कर्नाटकात फैलाव वाढतो आहे, ही गोष्ट खरी असली तरी बेळगावसह इतर राज्यांच्या सीमेवरील नाके बंद करण्याचा विचार सरकारसमोर नाही, अशी माहिती उच्चशिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांनी बुधवारी दिली.
काही कार्यक्रमात भाग घेण्यासाठी बुधवारी उच्चशिक्षण मंत्री बेळगावला आले होते. पत्रकारांनी त्यांची भेट घेतली असता आंतरराज्य सीमेवरील तपास नाक्मयांवर खबरदारी वाढविण्यात येणार आहे. महाराष्ट्र, केरळसह इतर राज्यांतून कर्नाटकात येणाऱयांची तपासणी करण्यात येणार आहे. केवळ बाधितांनाच प्रवेशबंदी असणार आहे, असे त्यांनी सांगितले.
आंतरराज्य वाहतूक व इतर कार्यक्रमांना बंदी असणार नाही. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून राज्यात 15 दिवस विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. संपूर्ण लॉकडाऊन टाळण्यासाठीच हा उपाय करण्यात येत आहे. खासकरून बेंगळूर येथे परिस्थिती हाताळण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच राजधानीत दोन आठवडे शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.
15 ते 18 वयोगटातील मुलांनाही लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. डॉक्टर, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचाऱयांना बुस्टर डोस देण्यात येत आहे. दहा दिवसांनंतर पुन्हा एकदा चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.









