वार्ताहर / धामोड
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागातील तुळशी खोऱ्यातील केळोशी बु॥ येथील लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने आज रविवारी भरला. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने उर्वरीत पाण्याचा प्रवाह उजव्या तीरावरील कालव्यातून थेट तुळशी जलाशयात सुरू झाला आहे. त्यामुळे ५५ टक्के भरलेल्या तुळशी जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.एवढया लवकर ‘ ओव्हर फ्लो ‘ होणारा राधानगरी तालुक्यातील खामकरवाडीनंतर केळोशी हा दुसरा प्रकल्प म्हणावा लागेल.
केळोशी बु॥ येथील बैलगोंड नावाच्या लोंढानाल्यावर ५६०३.२२५ सहस्त्र घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा लघुपाटबंधारे प्रकल्प सन २००६ साली बांधण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे केळोशी बु॥, कुंभारवाडी, सुतारवाडी, पिलावरेवाडी, देऊळवाडी, जाधववाडी, वळवंटवाडी, खामकरवाडी, अवचितवाडी, कुरणेवाडी कोते, चांदे आदी गावांना कमी – अधिक प्रमाणात शेतीसाठी फायदा झाला आहे. ऐन उन्हाळ्यात जानेवारी -फेब्रुवारी पासूनच हा प्रकल्प रिकामा होतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.
सध्या परिसरात पावसाची रिपरिप सुरु असून गेल्या २४ तासात १९ मिमी तर आज अखेर १०९८ मी. मी. पावसाची नोंद प्रकल्प क्षेत्रात झाली आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने उर्वरित पाणी उजव्या तीरावरील सांडव्यावरुन थेट तुळशी जलाशयात वाहत आहे. त्यामुळे तुळशी जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत असून धरणाची पाणी पातळी ६०६ .९० मीटर इतकी झाली आहे. सध्या तुळशी जलाशय ५५ टक्के भरले असून केळोशी प्रकल्पाच्या पाण्यामुळे यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. केळोशी प्रकल्प गतसाली ११ जुलैला भरला होता, तर चालू वर्षी १९ जुलैला भरला आहे. अंतर्गत उगाळ तसेच पाऊस समाधानकारक झाल्यास केळोशी लघुप्रकल्पामुळे तुळशी जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल असे शाखा अभियंता विजयराव आंबोळे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
Previous Articleलॉकडाऊममध्ये शुक्रवार पेठेत होतेय वृक्ष तोड
Next Article लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघातात 5 ठार, 18 जखमी








